उरणमध्ये दारूची दुकाने न उघडल्याने नागरिकांची निराशा

उरण: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ४ मे पासून तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील असे सांगण्यात आले . त्यामुळे उरणमध्ये सकाळपासूनच

 उरण: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली  आहे. त्यामुळे ४ मे पासून तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील असे सांगण्यात आले . त्यामुळे उरणमध्ये सकाळपासूनच मद्यप्रेमींनी वाईन शॉप बाहेर गर्दी केली. काही जण तर तीन चार तासांपासून रांगेत ताटकळत उभे होते. मात्र दारूची दुकाने उघडणार नसल्याचे समजताच मद्यप्रेमींनी घरचा रस्ता धरला.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र या काळातही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. यानंतर  अनेक मद्यप्रेमींनी वाईन शॉपसमोर गर्दी केली होती.  उरणमध्ये सकाळी ६  वाजल्यापासूनच काही मद्यप्रेमी वाईन शॉपसमोर जमा झाले  होते. अनेक दिवसांनंतर दारु मिळणार यासाठी अनेक जण तब्बल ३ ते ४ तास रांगेत उभे होते. त्यामुळे उरण शहरातील सर्व वाईन शॉपच्या दुकानांसमोर अर्धा किमीपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. तोंडाला मास्क, हातात पिशव्या आणि पैसे घेऊन अनेकजण भर उन्हात उभे होते. अनेक दिवसानंतर दारु मिळणार असल्याने त्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता. रेशन धान्य दुकानासमोर ज्याप्रमाणे कूपन घेण्यासाठी अनेकांनी रांगा लावल्या होत्या, तशीच रांग दारुसाठी लागली होती. मात्र प्रशासनाकडून कोणताही आदेश न आल्याने वाईन शॉप सुरु झाले नाही. त्यामुळे तीन ते चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर मद्य प्रेमींची घोर निराशा झाली.  दारूचे दुकान सुरू होणार नसल्याचे समजताच वाईन शॉप समोरील गर्दी कमी झाली.