ग्रामीण परिवर्तनाचे ‘मानबिंदू’ वामन कामथेकर यांचे निधन, विभागात शोककळा!

रोहा : मुख्यतः कोलाड विभागातील ग्रामीण सर्वकश: परिवर्तनाचे मानबिंदू, ग्रामीणात शिक्षणाची गंगोत्री आणण्यासाठी अविरत झटलेले शिक्षणप्रेमी वामन कामथेकर यांचे सोमवार ७ सप्टेंबर रोजी कुडली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. कामथेकर यांच्या निधनाने सामाजिक भान असलेले, शिक्षणाचा जिज्ञासू भोक्ता हरपला अशी सार्वत्रिक श्रंद्धाजली अर्पण करण्यात आली.

कुडली येथील रहिवासी वामन बाबू कामथेकर यांनी उमेदीत सामाजिक, राजकारण यांसह शिक्षण क्षेत्रात बहुमोल कार्य केले. त्याच भूमिकेतून तब्बल एक तप ग्रामपंचायतीचे सरपंचपद यशस्वीपणे सांभाळले. कामथेकर यांच्यावर डाव्या विचारसरणीचा पगडा होता. बहुजन शिक्षणाचे उद्दगाते कै.प्रभाकर पाटील यांच्या समवेत विभागात शिक्षण व इतर क्षेत्रात मोठे काम केले. ग्रामपंचयातीत त्याकाळी प्रथम वीज आणण्याचे भाग्य कामथेकर यांना मिळाले. सतत उद्योगी म्हणून त्यांचा सबंध विभागात लौकिक होता. खेळकर वृत्तीतून गावात पहिल्यांदा लाऊडस्पीकर आणून सर्वांचेच मनोरंजन केले.

गावअंतर्गत रस्त्यांना प्राधान्य देत रस्त्यांचे डांबरीकरण केले. विभागातील मुलांना शिक्षणाच्या सोयीसाठी तांबे विद्यालयाच्या उभारणीत योगदान दिले. मुलींच्या शिक्षणाचा हट्टहास कायम ठेवत स्वत:च्या मुलींसह मुलांना उच्चशिक्षित केले. त्यामुळेच कामथेकर यांना शिक्षणप्रेमी म्हटले जाते. ते उत्तम, तेवढेच कष्टाळू शेतकरी होते. त्यातून सर्वच मुलांना कर्तबगार बनविले. पुढे खा.सुनिल तटकरेंचे खंदे समर्थक होऊन ग्रमापंचयात विकासाचे कार्य अखंड सुरु ठेवले. त्याच वामन कामथेकर यांना देवाज्ञा झाल्याने विभागात शोककळा पसरली आहे.

वामन कामथेकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच सामाजिक, राजकीय, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. सामाजिक तसेच शिक्षणाचा जिज्ञासू भोक्ता हरपला. ग्रामीण परिवर्तनाचे मानबिंदू सोडून गेले अशी श्रद्धांजली वाहण्यात आली. पालकमंत्री आदिती तटकरे, खा.सुनिल तटकरे, आ.अनिकेत तटकरे, माजी आ.अवधूत तटकरे तांबे विद्यालयाचे सर्वेसर्वा आर.एच.तांबे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कामथेकर कुटुंबाचे सात्वन केले.

कै.वामन कामथेकर यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. वामन कामथेकर यांचा धार्मिक दशक्रिया विधी बुधवार १६ सप्टेंबर तर उत्तरकार्य शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी कुडली निवासस्थानी होणार आहे अशी माहिती त्यांचे चिरंजीव विजय कामथेकर यांनी दिली. दरम्यान कामथेकर कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी झालात, धीर दिलात त्याबद्दल ऋणी आहोत, अशी भावना कामथेकर कुटुंबाने व्यक्त केली.