व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा कोरोनाबाधित रूग्णांवर होतोय प्रभाव

श्रीवर्धन तालुक्यात एकूण १७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी १४४ जण पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर दहा जणांचा मृत्यू झाला असून २२ जण कोरोनावरती घरच्या घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत किंवा काही जणांची परिस्थिती थोडी वेगळी असल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

श्रीवर्धन –  श्रीवर्धन तालुक्यात सापडलेले अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरच्या घरीच विलगीकरणात ठेवून बरे झाले आहेत. तर काहींना लोणेरे येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते त्या ठिकाणचे रुग्ण देखील पुर्णपणे बरे होऊन घरी आलेले आहेत. आतापर्यंत श्रीवर्धन तालुक्यात एकूण १७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी १४४ जण पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर दहा जणांचा मृत्यू झाला असून २२ जण कोरोनावरती घरच्या घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत किंवा काही जणांची परिस्थिती थोडी वेगळी असल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

श्रीवर्धन तालुक्यात रुग्ण बरे होण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिकांना बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु फक्त व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्ती पाच ते सहा दिवसात बरे होतात, असा अजब प्रकार देखील समोर आला आहे. श्रीवर्धनमधील एक चाळीस वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आला होता. परंतु या तरुणाने घरीच राहून उपचार घेतले. मात्र त्याला फक्त व्हिटॅमिनच्या गोळ्या देण्यात आल्या, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही गोळ्या न घेता त्याला सातव्या दिवशी आपण बरे झाला आहात असे सांगण्यात आले. वास्तविक पाहता कोरोनाची चाचणी जेंव्हा घेतली जाते आणि एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह येते. त्यानंतर त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्याचे पुन्हा स्वैब घेणे आवश्यक असताना प्रशासनाकडून असा कोणताही प्रकार करण्यात येत नाही. या अनुषंगाने आता सोशल मीडियावर देखील काही विनोद पसरू लागले आहेत.

“चार महिन्यानंतर कळले की कोरोनाचा फुल फॉर्म कोणताच रोग नाही” अशा प्रकारचे विनोद सोशल मीडियावर करताना पाहायला मिळत आहेत. विनोदाचा भाग सोडून कोरोनाची लागण होऊ नये यासाठी नागरिकांनी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अद्यापही श्रीवर्धन बाजारपेठेत किंवा गर्दीच्या ठिकाणी अनेक नागरिक मास्क न वापरता फिरत असल्याचे पाहायला मिळतात. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून येत नाहीत. उदाहरणार्थ ताप, सर्दी, खोकला इत्यादी प्रकार अजिबात आढळून येत नाहीत, मग कोरोनाची चाचणी घेतली जाते यामध्ये काही गडबड आहे का अशी चर्चा श्रीवर्धनमधील नागरिकांमध्ये सुरू आहे.