amba river bridge overflow

पाली(Pali) येथील आंबा नदीवरील पूल,जांभूळपाडा, भेरव नदीवरील पूल(Water On Amba River Bridge) सलग दोन दिवस पाण्याखाली गेले.त्यामुळे नागरिकांचा मोठा खोळंबा झाला आहे.

    पाली :अतिवृष्टीमुळे सुधागडातील(Sudhagad) आंबा नदीच्या(Amba River) पाणी पात्रात वाढ होत आहे. पाली(Pali) येथील आंबा नदीवरील पूल,जांभूळपाडा, भेरव नदीवरील पूल(Water On Amba River Bridge) सलग दोन दिवस पाण्याखाली गेले.त्यामुळे नागरिकांचा मोठा खोळंबा झाला आहे.कामासाठी घरातून बाहेर पडलेले नागरिक पुलांवर पाणी असल्यामुळे त्याठिकाणी अडकून पडले. मात्र नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तालुका पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त त्याठिकाणी ठेवण्यात आला. पाली खोपोली वाकण या महामार्गावर असणाऱ्या पेडली गावालगत असणाऱ्या नदीच्या पाणी पात्रात वाढ होऊन पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे पेडली गावातील नागरिक धास्तावले होते.

    अतिवृष्टीमुळे सुधागडात मोठ्या प्रमाणावर  नैसर्गिक आपत्ती झाली नसली तरी काही भागात लोकांच्या घराचे,जनावरांच्या गोठ्यांचे  नुकसान झाले आहे. सुधागडातील नवघर ग्रामपंचायत हद्दीत धोंडीवली गावातील रघुनाथ यादव यांच्या घराची भिंती कोसळली असून कोंडगाव गावात चिंतामण तुपे यांच्या गुरांच्या गोठ्याची भिंती कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    सुधागडातील नद्यांमध्ये होणाऱ्या पाणी पातळीत वाढ ही सुधागड वासीयांसाठी चिंतेची बाब होती.या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासून पाली खोपोली वाकण या महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली.