रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर,टंचाईग्रस्त गावांचे वाढले प्रमाण

प्रणय पाटील, अलिबाग : रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले आहे. दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होत असून, जिल्ह्यातील ३३ गावे व १४८ वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत

प्रणय पाटील, अलिबाग : रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले आहे. दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होत असून, जिल्ह्यातील ३३ गावे व १४८ वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गावांना १७ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असला तरी, तो पाणी पुरवठा पुरेसा नसल्याचे चित्र दिसून येते. यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत असून, दोन-ते तीन किलोमीटरची पायपीट करुन त्यांना पाणी आणावे लागत आहे. आठवडाभरात जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे-वाड्यांमध्ये ५५ ने वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडूनही योग्य नियोजनाअभावी रायगड जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील नद्यांवर पुरेशी धरणे नसल्याने पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून टंचाई निवारण आराखडा तयार करुन, उपाययोजना करण्यात येतात. त्यानुसार टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येते, मात्र हे नियोजन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुरेसे नसल्याचे दिसून येते.

रायगड जिल्ह्याला सध्या तीव्र पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ४ तालुक्यांमधील १८१ गावे व वाड्यांवर पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या गावे वाड्यांना १७ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र हा पाणी पुरवठा पुरेसा नाही. टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रमाण दर १० ते ११ गावे व वाड्यांना १ टँकर इतके आहे. यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, त्यांना दिड ते दोन किलोमीटरची पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी खासगी टँकरच्या माध्यमातून विकतचे पाणी नागरिक मागवित असल्याचे चित्रही दिसून येते.
तालुका   टंचाईग्रस्त गावे   वाड्या   टँकर
पेण              १०                   ७४      ७७
रोहा               ४                    २        १
महाड            ५                    ३७       ४
पोलादपूर      १४                   ३५      ५
 मागील आठवड्यात जिल्ह्यातील १२६ गावे-वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली होती. यामध्ये २९ गावे व ९७ वाड्यांचा समावेश होता. त्यांना १७ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र आठवडाभरात टंचाईग्रस्त गावांमध्ये ५५ ने वाढ झाली असून, सद्यस्थितीत १८१ गावे व वाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये ३३ गावे व १४८ वाड्यांचा समावेश असून, त्यांना १७ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरु आहे.