दहीवलीमध्ये पाणीटंचाईचे संकट, घोटभर पाण्यासाठी लोकांची वणवण

तळा : तळा तालुक्यातील दहीवली गावाला कोरोना संकटाबरोबरच आता भीषण पाणी टंचाईच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे.घोटभर पाण्यासाठी येथील महिलांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे.एका बाजूला कोरोना संक्रमणाचे

तळा : तळा तालुक्यातील दहीवली गावाला कोरोना संकटाबरोबरच आता भीषण पाणी टंचाईच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे.घोटभर पाण्यासाठी येथील महिलांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे.एका बाजूला कोरोना संक्रमणाचे संकट उभे आहे तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील काही भागात भीषण पाणीटंचाईचे संकट आ वासून उभे ठाकले आहे.

तळा तालुक्यातील दहीवली गावात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू असून पाण्यावाचून दिवस कसे काढायचे ,असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.गावात कुठेही पाणी मिळत नसल्याने बोअरवेलमधील तुटपुंज्या पाण्यावर संपूर्ण गावाला तहान भागवावी लागत आहे.तळा तालुक्यातील ऊसरखुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या दहीवली गावाची साधारणतः साडे सहाशे ते सातशे लोकसंख्या असून एप्रिल महिन्यापासून गावातील बोअरवेल व विहिरींनी तळ गाठला आहे.पिण्यासाठी व दैनंदिन गरजेसाठी पाणी उपलब्ध नसल्याने गावातील बोअरवेलमधून मिळत असलेले अशुद्ध पाणी वापरावे लागत आहे. मात्र या अशुद्ध पाण्यामुळे काही आजार उद्भवण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दहीवली गाव आणि दहीवली बौद्धवाडीसाठी शासनाने केंद्रीय पेयजल योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.परंतु विहिरीच्या वरील भागात काकल येथील काही शेतकऱ्यांनी नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधले आहेत.परिणामी नदीच्या खालच्या भागात पाणी जात नसल्याने शासनाने बांधलेल्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.त्यामुळे लाखो रुपये खर्च करून राबविण्यात आलेली पाणी योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. दहीवली गावात कोरोना संकटामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी गावी येत आहेत. त्यांनासुद्धा पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.पाणी प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दहीवली ग्रामस्थांनी तळा तहसीलदार व ऊसरखुर्द सरपंचांना ५ मे रोजी लेखी निवेदन दिले. मात्र आज सतरा दिवस उलटूनही यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गावात विहीर व बोअरवेल असून पाण्याची पातळी खोल गेल्याने या गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे सर्व यंत्रणा सांगते. मात्र कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी यासाठी नदीवरील बंधारा काढण्यात यावा अन्यथा टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.कोरोनाचे संकट सर्वत्र पसरले असून संचारबंदीत कामधंदे व मजुरी बंद आहे एकीकडे उपासमारी तर दुसरीकडे पाण्याची चणचण आशा दुहेरी संकटाचा सामना दहीवली ग्रामस्थांना करावा लागत आहे.

दहीवली गावात उद्भवलेल्या पाणी टंचाईबाबत प्रस्ताव पाठविला असून टँकर सुरू करण्याची मागणी आहे. गावातील पाण्याची पातळी अतिशय खोल असल्याने विहिरी व बोअरवेल असून नसल्यासारखे होतात आणि याच कारणामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास अडचणी निर्माण होतात.दहीवली हे गाव आराखड्यात नाही परंतु वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करून विशेष बाब म्हणून त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल. 
– व्ही.व्ही.यादव, गटविकास अधिकारी, पंचायत समिती तळा