aditi tatkare in mhasala

म्हसळा : कोरोना प्रादुर्भावावर यशस्वीपणे मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात महाराष्ट्रातील सर्वच जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षतेसाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम जाहीर केली आहे. या मोहिमेत २५ ऑक्टोबरपर्यंत दोन टप्प्यात शासनाचे आरोग्य अधिकारी, शिक्षक, स्वयंसेवक, आशा, आरोग्य सेविका असे पाच जणांचे पथक घरोगरी जाऊन प्रत्येक नागरिकांची ट्रेस, ट्रॅक, ट्रीट अशी त्रिसूत्री तपासणी करणार आहेत. या तपासणीसाठी म्हसळा तालुक्यातील सर्वच नागरिकांनी शासकीय आरोग्य पथकास आपलेच आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे (aditi tatkare)यांनी म्हसळा(mhasala) येथे केले आहे.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा कुंभारआळी येथे पत्रकार उदय कळस आणि बौद्धवाडी येथील नगरसेवक करण गायकवाड व अन्य पाच कुटुंबाचे निवासस्थानी जाऊन  तेथील सदस्यांची आरोग्य तपासणी करून कार्यक्रमाला सुरुवात केली.

यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, शहरी भागात ज्या प्रमाणांत कोरोनाचे रुग्ण आढळून येते आहेत तसे आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येते आहे. कोरोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाची ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीपणे राबविल्यास गाववाडीत एकही कोरोनाबाधित रुग्ण उपचाराविना शिल्लक राहणार नाही ही खबरदारी म्हणुन सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. ज्यांना कोविड-१९ ची लक्षण आहेत त्यांना  तातडीने उपचार सुरू केले जातील तर अन्य रुग्णांची जशी लक्षणे आहेत त्यानुसार तपासणी व माहिती अद्ययावत करून ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी केली जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. हे सर्व करण्यासाठी जेवढी जबाबदारी आरोग्य पथकाची आहे तेवढीच ती नागरिकांची ही आहे असे आवर्जुन सांगताना नागरिकांनी कोविड बाबत सुरक्षितता आणि काळजीपूर्वक मास्क, सॅनिटायझर, यांचा वापर करावा.
मोहीम यशस्वी होण्यासाठी जर कदाचित नागरिकांचे सहकार्य मिळत नसेल तर गाव पातळीवरील समाजसेवक, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लोकांना समजावुन आपल्या आरोग्याची काळजी व जबाबदारी आपण घेतली पाहिजे असे सुचित केले.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे,सभापती उज्वला सावंत, नगराध्यक्षा जयश्री कापरे,माजी सभापती नाझीम हसवारे, सभापती छाया म्हात्रे, पंचायत समिती सदस्य संदीप चाचले, अनिल बसवत, प्रांताधिकारी अमित शेडगे,तहसिलदार शरद गोसावी,मुख्याधिकारी मनोज उकिर्डे,गटविकास अधिकारी वाय एम.प्रभे,वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल भगत,माजी नगराध्यक्षा कविता बोरकर, भाई बोरकर आदी मान्यवर पदाधिकारी व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत रायगड जिल्ह्यात १५०० आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली असुन म्हसळा तालुका शहरात ४ तर ग्रामीण भागात ५ आरोग्य पथके माझे कुटुंब-माझा परिवाराच्या तपासणीसाठी सज्ज असल्याचे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी  सांगितले.