निसर्ग चक्रीवादळानंतर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत केव्हा होणार? नागरिकांचा प्रशासनाला सवाल

श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्याला उध्वस्त करून टाकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळा नंतर खंडित झालेला वीजपुरवठा केव्हा सुरू होणार? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. वादळानंतर आजचा चौथा दिवस

श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्याला उध्वस्त करून टाकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळा नंतर खंडित झालेला वीजपुरवठा केव्हा सुरू होणार? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. वादळानंतर आजचा चौथा दिवस उजाडला तरीही महावितरणचे कर्मचारी किंवा अभियंते कोणत्याही भागांमध्ये फिरताना किंवा पाहणी करताना दिसून आलेले नाहीत. श्रीवर्धन मध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून विज तारांवर पडल्यामुळे अनेक ठिकाणच्या विजेच्या तारा जागोजागी लोंबकळत आहेत तर अनेक विजेचे खांब वाकडे  झालेत किंवा रस्त्यावर पडलेले आहेत.

रस्त्यावर पडलेले पोल किंवा  वाहतुकीस अडथळा असणारे पोल एनडीआरएफच्या टीमने बाजूला केले आहेत. तालुका प्रशासनाकडून देखील वीजपुरवठा केव्हा सुरू होईल याबाबत कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात येत नाही. महावितरण किंवा वीज पारेषण कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असले तरीही नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करणे गरजेचे आहे. वीजपुरवठा खंडित असल्यामुळे अनेक नागरिकांना पाणीदेखील विहिरीतून हाताने काढून भरावे लागत आहे.

रस्त्यात लोंबकळत असलेल्या विज तारांमुळे कोणत्याही दुचाकीस्वाराचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महावितरणच्या अभियंत्यांनी सदर ठिकाणाची पाहणी करून आपल्या कर्मचारी वर्गाकडून लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा व्यवस्थित गुंडाळून एक बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वादळानंतर दुसऱ्या दिवशी श्रीवर्धनला भेट दिली होती. परंतु वीज पुरवठया बाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तरी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी वीजपुरवठा केव्हा सुरू होईल याबाबत प्रसिद्धीपत्रक काढावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.