morbe dam

पनवेल : पनवेल(panvel) तालुक्यातील कोंडले-मोरबे धरणात(morbe dam) एका महिलेचा मृतदेह(dead body of woman) बुधवारी बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या मृतदेहाच्या तपासासाठी पनवेल तालुका पोलिसांची पथके तसेच गुन्हे अन्वेषण विभागाची विविध पथके परिसरातील गावे पिंजून काढत आहेत. हा प्रकार खुनाचा असल्याने कोणत्या कारणासाठी या महिलेला मारण्यात आले असावे,याचा शोध घेण्यात येत आहे. यावेळी मोरबे गावातील नागरिकांनी पुढील काही दिवस नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोंडले-मोरबे धरणातील पाण्यात दोरीने बांधलेल्या व फुगलेल्या अवस्थेत तरंगत असलेल मृतदेह त्या परिसरात वावरणार्‍या ग्रामस्थांना दिसला होता. त्यांनी तातडीने पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना झाले. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त अशोक दुधे , सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे व गुन्हे प्रकटीकरण विभाग आदींचे पथक व अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. मृतदेह पोस्टमार्ट्मसाठी पाठवण्यात आला आहे.
या खुनाच्या तपासासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली असून या महिलेची हत्या ही अनैतिक संबंधातून झाली आहे का? परिसरातील गावांमधील एखादी महिला बेपत्ता झाली आहे का? किंवा बाहेर गावावरुन या महिलेला मारुन येथे टाकण्यात आले आहे का? अशा वेगवेगळ्या प्रकारे पोलिसांची पथके शोध घेत असून गुप्त बातमीदारांद्वारे सुद्धा या खुनाचा उलघडा करण्यासाठी कामाला लागले आहेत. मोरबे गावातील नागरिकांनी पुढील काही दिवस नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे आवाहन ही मोरबे पोलीस पाटील संजय पाटील यांनी केले आहे. .