श्रीवर्धन आगार प्रमुखांकडून वाहतूक निरीक्षक सहकारी महिलेचा मानसिक छळ – पोलीस आणि पालकमंत्र्यांकडे न्यायासाठी मागितली दाद

म्हसळा : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात काम करणाऱ्या एका आगार प्रमुखाकडून वाहतूक निरीक्षक या पदावर काम करणाऱ्या महिलेचा वारंवार मानसिक छळ होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या मानसिक

 म्हसळा : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात काम करणाऱ्या एका आगार प्रमुखाकडून वाहतूक निरीक्षक या पदावर काम करणाऱ्या महिलेचा वारंवार मानसिक छळ होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या मानसिक छळाच्या त्रासाने संबंधित महिला गर्भवती असताना तिचा दीड महिन्यांचा बाळ या जगात येण्यापूर्वीच हे जग सोडून गेले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, रायगड जिल्हा परिवहन विभाग यांच्या अधिपत्याखाली असलेले श्रीवर्धन आगारामधील आगार प्रमुख जुनेदी हे वाहतूक निरीक्षक शर्वरी लांजेकर यांचा अनेक महिन्यांपासून मानसिक छळ करीत आहेत. त्यामुळे या पीडित महिलेने श्रीवर्धन आगार प्रमुख एम.बी.जुनेदी यांच्या विरोधात मानसिक छळाची तक्रार पोलीस अधीक्षक रायगड, अलिबाग यांच्याकडे पाठवली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, महिला आयोग अलिबाग यांनादेखील माहितीसाठी तक्रार अर्ज दिला आहे.

या तक्रारीत आगार प्रमुख एम.बी.जुनेदी हे प्रत्यक्ष व फोन द्वारे अनेकदा उद्धटपणे दम देत असल्याचे सांगितले आहे. तसेच वैद्यकीय रजा नाकारणे, मर्जीतील व्यक्तींना रजा देणे, कोणतीही चूक नसताना खोटी कारणे वरिष्ठ कार्यालयाला सांगून निलंबनाची कारवाई करणे असे अनेक आरोप या तक्रारपत्रात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही महिला काही महिन्यांपूर्वी गर्भवती झाल्यानंतर योग्य ते वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय रजेची मागणी करूनसुद्धा आगार प्रमुखांनी रजा न दिल्याने संबधित तक्रारदार महिलेचे बाळ या जगात येण्यापूर्वीच हे जग सोडून गेल्याचे धक्कादायक वास्तव महिलेने सांगितले आहे. तसेच लॉकडाऊन कालावधीत आगार प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून दोन महिने गावी निघून गेले. वरिष्ठ अधिकारी व काही राजकारणी पुढारी यांचा जुनेदी यांच्यावर वरदहस्त असल्याची शक्यतादेखील तक्रारदार महिलेने वर्तवली आहे.  

पीडित महिलेचा तक्रार अर्ज ईमेलद्वारे पोलीस अधीक्षक रायगड, अलिबाग कार्यालयात पोहोचल्यानंतर संबधित कार्यालयाकडून चौकशी करण्यासाठी म्हसळा पोलीस ठाण्याला आदेश मिळाले आहेत.  त्याचबरोबर संबधित पीडित महिलेने महाराष्ट्र राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना तक्रार अर्जाची एक प्रत रवाना केली असून पालकमंत्र्यांकडे न्यायासाठी विनवणी केली आहे. त्यामुळे संबधित प्रकरणी पालकमंत्री आदिती तटकरे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि विशेषतः महिला वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर आगार प्रमुख जुनेदी यांच्या मनमानी कारभारा विषयी या पूर्वी देखील श्रीवर्धन आगारातील सतिश देसाई हे चालक उपोषणाला बसले होते मात्र त्या नंतर सुद्धा जुनेदी याच्यावर वरिष्ठांमार्फत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे जुनेदी यांना वरिष्ठ पाठीशी घालत असल्याचा आणि त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याची जोरदार चर्चा श्रीवर्धन आगारातील कामगार वर्गात तसेच म्हसळा, श्रीवर्धन मधील जनतेत सुरू आहे.

 तक्रार घेऊन म्हसळा पोलीस ठाण्यात गेली असता म्हसळा पोलीस ठाण्यात फक्त जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. मात्र कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही, असे वाहतूक नियंत्रक (तक्रारदार) शर्वरी लांजेकर यांच्याकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तसेच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या स्थानिक आमदार असलेल्या आदिती तटकरे या देखील एक महिलाच असल्याने त्यांच्या मतदारसंघात शासकीय विभागातील महिला कर्मचारी यांच्याबाबतीत अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ करणे किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणे अशा घटना वाढत आहेत. त्याचबरोबर सामान्य महिला वर्ग यांच्यावर देखील अन्याय, अत्याचार होणे याबाबत देखील वाढ होत असल्याने आता श्रीवर्धन आगारातील वाहतूक नियंत्रक महिलेचा आगार प्रमुख एम.बी.जुनेदी यांच्याकडून होत असलेल्या मानसिक छळाबाबत पालकमंत्री आदिती तटकरे काय भूमिका घेणार..? हे पाहणे आवश्यक आहे.

आगार प्रमुख एम.बी.जुनेदी हे माझ्या पत्नीला कामाच्या ठिकाणी अनेक वेळा त्रास देत असून तिचा मानसिक छळ करीत आहेत. सहकारी महिला कर्मचारीसोबत कसे वागावे हे न काळणाऱ्या आगार प्रमुखावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आम्ही संबंधित घटनेची माहिती देण्यासाठी म्हसळा पोलीस ठाण्यात गेलो असता तिथे फक्त माझ्या पत्नीचा जबाब नोंदवून घेण्यात आला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आम्हाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे.

– समीर लांजेकर, तक्रारदार महिलेचे पती