raksha bandhan movie

‘फुलो का तारों का सबका कहना है’.. पासून रुपेरी पडद्यावरील रक्षाबंधन(Rakshabandhan) प्रामुख्याने गीत-संगीताच्या रुपातून आपल्या समोर येते. बॉलिवूडमधील भाऊ-बहिणीच्या (Brothers And Sisters In Bollywood) नात्यांची काही महत्वाची उदाहरणे सांगता येतील आणि काही वैशिष्ट्येही..

  आपल्या देशातील मराठीसह सर्व प्रादेशिक भाषेतील चित्रपट(Regional Cinema) आणि हिंदी चित्रपटाचे(Hindi Movies) वर्षानुवर्षाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात आपल्याकडील सर्व सण संस्कृती आणि नाते संस्कृती यांना कायमच रुपेरी पडद्यावर स्थान दिले आहे. रक्षाबंधनाच्या(Rakshabandhan 2021) बाबतीतही तेच झाल्याचे दिसून येते. याबाबत आवर्जून नाव घ्यायला हवे ते गानसम्राज्ञी लता मंगेशकर(Lata Mangeshkar And Dilip Kumar) आणि दिलीपकुमार यांच्या मानलेल्या भाऊ-बहीण नात्याचे! लतादीदी कायमच दिलीपकुमार यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधत. अर्थात, कालांतराने दिलीपकुमारांची तब्येत खालावल्याने या प्रथेत खंड पडला. पण तरीही लतादीदी रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपला भाऊ दिलीपकुमारला राखी बांधतोय असे म्हणतच फोटो ट्विट करीत. यातूनच त्यांचे एकमेकांवरचे प्रेम आणि विश्वासाचे नाते दिसून येई. दिलीप कुमारच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त करतानाही लतादीदींनी या गोष्टीचा खास उल्लेख केला. हे असे वेगळे रक्षाबंधन एकूणच समाजासाठी एक वेगळा आदर्श ठरते. त्यात सामाजिक सांस्कृतिक सभ्यता, परंपरा, मूल्य आणि संस्कृती यांचा प्रत्यय येतो.

  रुपेरी पडद्यावरील रक्षाबंधन प्रामुख्याने गीत संगीताच्या रुपातून आपल्या समोर येते. त्यातील काही महत्वाची उदाहरणे सांगता येतील आणि काही वैशिष्ट्येही सांगता येतील. फार पूर्वी रेडिओ सिलोन आणि विविध भारती यावर रक्षाबंधनाच्या दिवशी लागणारे पहिले गाणे होते, ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना‘ ( छोटी बहन). आमचे गिरगावकर दिग्दर्शक मनमोहन देसाई यांना आपल्या चित्रपटात अशा घट्ट नातेसंबंधाची दखल घ्यायला नेहमीच आवडे. आपल्या आजूबाजूच्या समाजाचे दर्शन त्यातून घडवावे आणि तेच प्रेक्षकांना आवडते अशीच त्यांची भावना असे. आणि त्यातूनच ‘मेरी प्यारी बहेनीया बनेगी दुल्हनिया’ ( सच्चा झूठा) हे बहीण भावाच्या नात्यावरचे गाणे रुपेरी पडद्यावर आले आणि पूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी गल्ली-गल्लीत लाऊडस्पीकरवर हे गाणे वारंवार लावले जाई. चित्रपटात हे गाणे राजेश खन्नाने आपल्या स्टाईलने रंगवले. तर बेबी नाझ या चित्रपटात त्याच्या बहिणीच्या भूमिकेत होती. हा चित्रपट सुपर हिट ठरला आणि बेबी नाझला मोठ्या प्रमाणावर बहिणीच्या भूमिकांची ऑफर होत राहिल्या आणि तिने त्या साकारल्या.

  रक्षाबंधनाची आणखीन काही उल्लेखनीय गाणी सांगायची तर ‘राखी धागों का त्यौहार है ‘ ( राखी) , ‘ रंगबिरंगी राखी लेके आई बहना ‘( अनपढ़) , ‘बहेना ने भाई की कलाई पे ‘( रेशम की डोर), ‘ मेरे भय्या मेरे चंदा मेरे अनमोल रतन’ ( काजल) , ‘फुलो का तारो का ‘ ( हरे राम हरे कृष्ण) , ‘आज है सगाई सुन लडकी के भाई ‘ (प्यार तो होना ही था) , ‘प्यारा भय्या मेरा ‘ ( क्या कहेना) , ‘ यह राखी बंधन है ऐसा’ ( बेईमान) , ‘बहेना ओ बहेना’ ( अदालत) , ‘भाई बहेन का प्यार ‘ ( फरिश्ते) , हम बहनो के लिए प्यारे भैय्या ( अंजाना) , अब के बरस भैय्या के…( बंदिनी) , मेरी बहना राखी की लाज ( मेरा भैया) , बाबुल का यह घर ( दाता) , बहेना ओ बहेना ( शंकरा) , बहेने इतनी हसीन तो ( प्यार का देवता) , चंदा मेरे आज मेरे भाई से कहना ( चंबल की कसम) , मेरे राखी ( तिरंगा) अशी बरीच सांगता येतील.

  यातील देव आनंद दिग्दर्शित ‘हरे राम हरे कृष्ण ‘ ( १९७१) या चित्रपटातील ‘फूलो का तारो का सबका कहना है’ या गाण्याचा खास उल्लेख हवाच. लहानपणी हे गाणे भाऊ बहीण गातात. मोठेपणी या भूमिकेत देव आनंद आणि झीनत अमान आहेत. ( ही भूमिका देव आनंदने अगोदर जाहिदाला ऑफर केली होती. पण अमरजित दिग्दर्शित ‘गॅम्बलर ‘मध्ये देव आनंदची नायिका साकारली असल्याने, आता बहीण कशी साकारायची म्हणून तिने ही भूमिका नाकारली आणि झीनत अमानला मिळाली.) विशेष म्हणजे त्यानंतर हीरा पन्ना, डार्लिंग डार्लिंग, वॉरंट इत्यादी चित्रपटात देव आनंद आणि झीनत अमान यांची रोमॅन्टीक जोडी जमली. तोच प्रकार मन्सूर खान दिग्दर्शित ‘जोश’ या चित्रपटात पाहायला मिळाला. यात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय, बहीण भावाच्या नात्यात आहेत आणि त्यानंतर आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘मोहब्बते ‘, संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘देवदास ‘मध्ये तेच प्रेमिकांच्या भूमिकेत दिसले.

  तसे पाहिले तर, राजश्री प्रॉडक्शन्स, प्रसाद प्रॉडक्शन्स, जेमिनी यानी आपल्या अनेक चित्रपटांतून अनेक प्रकारच्या नात्यांची परंपरा जपली. रुपेरी पडद्यावरील बहीण-भावाच्या नात्यात सांगायचे तर रणवीर सिंग व प्रियांका चोप्रा ‘दिल धडकने दो ‘मध्ये भाऊ व बहीण. तेच संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’मध्ये पती व पत्नी या नात्यात आहेत. रमेश देव व सीमाताई यांच्या पती पत्नी या नात्याची वेगळी ओळख सांगायला नकोच. हे दोघे ‘सरस्वतीचंद्र ‘ या हिंदी चित्रपटात भाऊ व बहीण नात्यात आहेत. तर चित्रपटसृष्टीतील मानलेल्या बहिण भावाच्या नात्याची आणखीन काही उदाहरणे द्यायची तर राजेश खन्ना व बिंदू, रुपेशकुमार व मुमताज हे मानलेले भाऊ व बहीण ही द्यायला हवी.

  असे करता करता राजश्री प्रॉडक्शन्सच्या वतीने ‘रक्षाबंधन ‘ नावाचा चित्रपट पडद्यावर आणला हेही सांगायला हवे. या चित्रपटात सचिन, सारिका, ललिता पवार, पल्लवी जोशी इत्यादींच्या भूमिका आहेत. तर बहीण-भावाच्या नात्यावरचे प्यारी बहना, मेरे भैया, भाई होतो तो ऐसा, मा, बहेन और बिवी अशा नावाचे चित्रपट चित्रपट पडद्यावर आले आहेत.

  जितेंद्रची मुले तुषार व एकता कपूर हे आदर्श भाऊ-बहीण मानले जातात. एक वेगळी आठवण सांगतो, हेमा मालिनीच्या भावाची ‘मार्ग ‘ नावाच्या चित्रपटाची निर्मिती. महेश भट्टच्या दिग्दर्शनात विनोद खन्ना व हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रविना टंडन, रानी मुखर्जी यांचे भाऊही चित्रपटसृष्टीत कार्यरत. अनिल कपूरची मुले सोनम व हर्षवर्धन हे कपूर भाऊ व बहिण हे एकाच वेळेस कार्यरत आहेत तसेच करिष्मा कपूर आणि करिना कपूर यांचा चुलत भाऊ रणबीर कपूरही कार्यरत आहेत. अगदी जुन्या पिढीतील नर्गिस व अन्वर हुसैन हे मागील पिढीतील कलाकार भाऊ-बहीण कार्यरत होते. आजच्या पिढीत सलमानचे भाऊ व बहीण याच क्षेत्रात तसेच सैफ व सोहा अली खान, फरहान व झोया अख्तर, श्रध्दा व सिध्दांत कपूर, फराह व साजिद खान असे भाऊ व बहीण कार्यरत आहेत. सत्तरच्या दशकात फरिदा जलाल, नाझिमा, सुप्रिया पाठक यांनी अनेक चित्रपटात हुकमी बहिणीची भूमिका साकारली आहे.

  – दिलीप ठाकूर