चिपळूणमधील नुकसानीला प्रशासन जबाबदार- नारायण राणे

चिपळूण मध्ये तीन दिवसांपूर्वी आलेल्या महापुरामुळे येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नारायण राणे चिपळूण दौऱ्यावर आले होते. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने या ठिकाणी भेट देऊन एकूण परिस्थितीचा आढावा देण्यास सांगितले आहे.

    चिपळूण: चिपळूण शहर आणि परिसरात निर्माण झालेल्या भीषण पूर स्थितीला येथील प्रशासन सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. येथील पूरग्रस्त जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून निश्चित करू असेही ते म्हणाले. चिपळूण मध्ये तीन दिवसांपूर्वी आलेल्या महापुरामुळे येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नारायण राणे चिपळूण दौऱ्यावर आले होते. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने या ठिकाणी भेट देऊन एकूण परिस्थितीचा आढावा देण्यास सांगितले आहे.

    आपण येथील जनतेला केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळावी आणि प्रत्येक व्यापारी, कुटुंब पुन्हा आपल्या पायावर उभे रहावे यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचेही राणे म्हणाले. भविष्यात अशा प्रकारची आपत्ती कोकणात येऊ नये यासाठी सर्वच पातळीवर योग्य ती उपाययोजना आणि नियोजन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राणे म्हणाले.

    नारायण राणे यांच्या दौऱ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, निलेश राणे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पूरस्थिती भयावह असल्याचे सांगून शासनाने तातडीची मदत देण्याची मागणी केली. तसेच आपण यासदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे ते म्हणाले.

    मुख्यमंत्री लक्ष्य
    नारायण राणे यांनी पूरपरिस्थितीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री असंवेदनशील असून पांढऱ्या पायाचे असल्याची टीका त्यांनी केली. त्यांचं सरकार आल्यापासून एका पाठोपाठ संकटं येत असल्याचे राणे म्हणाले.

    नारायण राणे यांनी आज दुपारी चिपळूण बाजारपेठेत फिरून पूर परिस्थितीची पाहणी केली. व्यापाऱ्यांचा आक्रोश, त्यांचं दुःख पाहून राणे भावविवश झाल्याचे दिसले.

    अधिकारी धारेवर..
    दौरा माहीत असूनही कोणताही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने नारायण राणे कमालीचे संतापले होते. त्यांनी या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना योग्य ते शासन केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असा सज्जड इशारा राणे यांनी दिला.