दीपाली चव्हाणनंतर आणखी एका महिला कर्मचाऱ्याने ऑन ड्युटी गळफास घेत केली आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर या पदावर असलेल्या पूर्वी तुरे यांनी ऑफिसमध्ये पंख्याला गळफास लावून ऑन ड्युटी आत्महत्या केली आहे. महिलेकडे कोणतीही सुसाईड नोट न आढळल्याने त्यांनी हे पाऊल का उचलले याबाबत गूढ निर्माण झाले आहे.

    रत्नागिरी : अमरावती जिल्ह्यात दीपाली चव्हाण या महिला वन अधिकाऱ्याच्या आत्महत्येचेप्रकरण ताजे असताना कोकणातून महिला कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले आहे. पोस्ट खात्यात पोस्ट मास्तर पदावर असलेल्या या महिलेने ऑफीसमध्येच आपली जीवनयात्रा संपवली.

    रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर या पदावर असलेल्या पूर्वी तुरे यांनी ऑफिसमध्ये पंख्याला गळफास लावून ऑन ड्युटी आत्महत्या केली आहे. महिलेकडे कोणतीही सुसाईड नोट न आढळल्याने त्यांनी हे पाऊल का उचलले याबाबत गूढ निर्माण झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घरगुती कारणांमुळे पूर्वी तुरे यांनी आत्महत्या केली की ऑफिसमधील कामाचा तणाव होता, हे स्पष्ट झाले नाही. सध्या तरी पूर्वी तुरे यांच्या आत्महत्येवरून तर्क लावले जात आहेत.

    नेहमीप्रमाणे पूर्वी तुरे (वय २५) या मुरुड येथील कार्यालयात कामानिमित्त गेल्या होत्या. त्यांचे पती सुशील तुरे हे हर्णै पोस्टात ड्युटीवर आहे. पूर्वी या दापोली पोस्टात पैसे देवाण घेवाणीचे मशीन घेऊन जायचे सांगून घरून निघाल्या होत्या. संध्याकाळी साडेसात वाजले तरी पूर्वी घरी आलेली नसल्याचे त्यांचे पती सुशील यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मित्रासोबत दापोली आणि हर्णै पोस्टात जावून पाहिलं. मात्र तिथे त्या आढळल्या नाही. त्यानंतर रात्री १०. १५ च्या सुमारास मुरूड पोस्टात गेल्यावर मुरुड पोस्ट कार्यालयाचे दार आतून बंद असल्याचे लक्षात आले, तर सुशील यांच्या पत्नी पूर्वी यांची चप्पल बाहेर दिसून आली. कार्यालयाचे दार उघडून पाहिल्यानंतर पोस्ट मास्तर पूर्वी तुरे या नायलॉन दोरीने गळफास लावून लटकलेल्या स्थितीत आढळून आल्या होत्या.