मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भास्कर जाधवांची अरेरावी; सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

पावसामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत असलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे.

    रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cmomaharashtra) यांनी चिपळूण आणि खेडमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. चिपळूण (chiplun) बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी एका महिलेनं मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही महिलेचं म्हणणं ऐकून धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांच्या आरेरावीमुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यांचं वागण्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

    दरम्यान यावरून नेटकऱ्यांनी सोशल मिडीयावर भास्कर जाधव यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरूवात केली आहे. तर भास्कर जाधवांना एवढा माज कसला? असा प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणाऱ्या महिलेवर हात उगारून भास्कर जाधवांना काय दाखवुन द्यायचं आहे? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    नेटकऱ्यांनी या प्रकरणात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत भास्कर जाधवांवर टीका करताना राज्य सरकारने अशा मुजोर लोकप्रतिनिधीवर कारवाई करावी, अशी देखील मागणी नेटकऱ्यांकडुन करण्यात येत आहे.

    सध्या भास्कर जाधव हे नाव खुप चर्चेत असून टीकेच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षानेसुद्धा राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच आता या प्रकरणामुळे भास्कर जाधव चांगलेच अडचणीत सापडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच येणाऱ्या काळात भास्कर जाधव हे या प्रकरणात काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.