गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेकडे चाकरमान्यांनी फिरवली पाठ

सरकार निर्णय घेण्याआधी हजारो चाकरमानी आपापल्या खासगी वाहनाने कोकणात गेले होते. त्यामुळे विशेष रेल्वेमध्ये प्रवाशांचा खडखडाट पहायला मिळत आहे. त्यामुळे जाताना गर्दी नसली तरी चाकरमानी गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी नक्कीच विशेष रेल्वेला भरघोस प्रतिसाद देतील. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी सरकारने विशेष रेल्वे सेवा सुरु केली आहे. परंतु सरकारला उशीरा सुचलेल्या शहानपणामुळे प्रथम २ रेल्वे गाड्यांना चाकरमान्यांचा थंड प्रतिसाद मिळाला आहे. शनिवार १५ ऑगस्ट रोजी कुर्ला टर्मिनसवरुन निघालेली रेल्वे जेव्हा रत्नागिरी स्थानकात दाखल झाली तेव्हा फक्त या रेल्वेतून अवघे ११ प्रवासी उतरले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटलेली रेल्वे गाडी रत्नागिरीत दाखल झाल्यावर अवघे १६ प्रवासी उतरले. त्यामुळे चाकरमान्यांनी पहिल्याच दिवशी विशेष रेल्वेला थंड प्रतिसाद दिला आहे. 

या रेल्वेतून काही चाकरमान्यांनी स्वॅब टेस्ट केली होती. तर काही प्रवाशांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेतले होते. सरकारने कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने १८२ रेल्वे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सरकारने दोन दिवसाआधी हा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय जर काही दिवसांपूर्वी घेतला असता तर अनेक चाकरमान्यांना याचा फायदा झाला असता. महामार्गांवरील वाहतूक कोंडीचे चित्र उद्भवले नसते. 

सरकारने निर्णय घेण्याआधी हजारो चाकरमानी आपापल्या खासगी वाहनाने कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे विशेष रेल्वेमध्ये प्रवाशांचा खडखडाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे जाताना गर्दी नसली तरी चाकरमानी गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी नक्कीच विशेष रेल्वेला भरघोस प्रतिसाद देतील. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.