चिपळूणचे कोव्हिड सेंटर पाण्याखाली ? २१ रुग्णांचा संपर्क तुटला

गेले आठ दिवस पडणाऱ्या पावसाने बुधवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरी(Heavy Rain In Ratnagiri) जिल्ह्यात जोर धरला. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजला. या पावसाचा सर्वाधिक फटका चिपळूण (Flood In Chiplun)शहराला बसला.

    चिपळूण : चिपळूण कोव्हिड सेंटरला पाण्याने घेरले(Water In Chiplun Covid Center) असून या रुग्णालयात काही कोरोना रुग्ण अडकले असल्याची माहिती मिळत आहे. साधारण २१ रुग्णांचे जीव धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. ऑक्सिजनचा पुरवठा ही बंद झाला असून रुग्णवाहिका ही वाहून गेली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच २१ रुग्णांसोबत संपर्कही होत नसल्याची माहिती मिळाली आहे.

    गेले आठ दिवस पडणाऱ्या पावसाने बुधवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात जोर धरला. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजला. या पावसाचा सर्वाधिक फटका चिपळूण शहराला बसला. चिपळूण शहर जलमय झाले. फूणगुस, कसबा, चांदेराई, नावडी, राजापूर शहर, खेड शहराचा काही भाग पाण्यात गेला होता. जगबुडी, बावनदी, मुचकुंदी, सोनवी, शास्त्री, गडनदी या नद्यांच्या धोक्याची पातळी ओलांडली. मुंबई- गोवा महामार्ग आणि चिपळूण- कराड मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.

    रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून २००५ची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ ,खेर्डीमध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग , कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.