kokan flood

रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस(Heavy Rain In Ratnagiri) कोसळत असून प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे.

  रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri)पावसाचा जोर सध्या दिसून येत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस(Heavy Rain In Ratnagiri) कोसळत असून प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. जिल्ह्यात ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला असून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याच्या दापोली, चिपळूणमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र आहे.गुहागर भागात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचे वृत्त आहे.

  चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून जुना बाजार पुलाला पाणी लागलं आहे. तर दापोलीतील आंबेडकर चौक, जालगाव, भारतनगर, शिवाजी नगर, केळसकर नाका, नागरपुरी या ठिकाणी देखील पाणी शिरलं होतं. पण, मध्यरात्री काही काळ पावसानं विश्रांती घेतल्यानंतर या भागातील पाणी ओसरलं आहे. पण, पावसाच्या परिस्थितीकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ मात्र व्यापाऱ्यांच्या काळजीत वाढ होत आहे.

  नदीकाठच्या नागरिकांची चिंता वाढली
  सध्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नदी किनारी असलेल्या चिपळूण, संगमेश्वर बाजारपेठेतील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहे. महिनाभरापूर्वी आलेल्या पुराच्या आठवणी ताज्या असताना ऐन गणेशोत्सवात पूरपरिस्थिती आल्यास करायचं काय ? सामान भरलेलं असल्यानं त्याचं नुकसान झाल्यास आम्हाला उभं राहणं देखील कठिण होणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शास्त्री, सोनवी, वशिष्ठी, जगबुडी या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. पावसानं उसंत घेतल्यानं सध्या व्यापाऱ्यांना हायसं वाटत असलं तरी पावसाचा जोर वाढल्यास व्यापाऱ्यांच्या काळजी भर पडत आहे.

  दापोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस
  दापोलीत ढगफुटी सदृश पावसानं रात्रभर धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या थैमानानं शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. दापोली शहरातील केळकर नाका शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात पुराचे पाणी चार ते पाच फूट वाढले अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने लोकांची धावपळ उडाली आहे. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री एक वाजेपर्यंत शहरातला पूर कायम होता. एक नंतर पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे पाणी ओसरले आहे.

  समुद्राला भरती
  मुसळधार पावसाचा इशारा आणि समुद्राला येणारी भरतीची वेळ देखील एकच होत असल्याचं सध्या दिसून येत आहे. जिल्ह्यात ११.४७ वाजता भरती असून यावेळी ३ मीटरपर्यंत लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. भरती आणि नद्यांना पूर आल्यास नद्यांना फुगवटा येतो आणि पाणी मानवीवस्तीत शिरल्याचं यापूर्वी दिसून आलेलं आहे