रत्नागिरी जिल्हा जलमय, जाणूनघ्या मागील २४ तासात कोणत्या तालूक्यात किती पाऊस?

रविवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी राजापूर शहर बाजारपेठेत शिरले आहे. या पुराच्या पाण्यातून कोंढेतड पुलानजीक सुमारे ३५ ते ४० वयाची एक व्यक्ती वाहून गेल्याची घडली आहे.

  अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

  सुरुवातीचे काही दिवस दडी मारलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा दमदार एन्ट्री मारली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने कोकणाला चांगलेच झोडपून काढले आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे.

  रविवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी राजापूर शहर बाजारपेठेत शिरले आहे. या पुराच्या पाण्यातून सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान कोंढेतड पुलानजीक सुमारे ३५ ते ४० वयाची एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.

  मागील २४ तासात कोणत्या तालूक्यात किती पाऊस?

  रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या २४ तासांत सरासरी ११५ मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक १५३ मिमी पाऊस राजापुरात पडला आहे. रत्नागिरी ७२ मिमी, चिपळूण १२३ मिमी, लांजा १२३ मिमी, मंडणगड १३७ मिमी, खेड ११८ मिमी, दापोली ७९ मिमी, गुहागर १३२ मिमी आणि संगमेश्वर १०२ मिमी पाऊस पडला आहे.

  दरम्यान, सलग दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे कोकणचे मुख्य पीक असलेली भात शेती पाण्याखाली गेली आहे.