रत्नागिरी जिल्ह्यात ३१ नवजात बालकांची कोरोनावर मात

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे येथील कोरोनाग्रस्तांची परिस्थीती पाहता, जिल्हा आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असूनही जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उत्तम प्रकारचे उपचार केले जात आहेत. 

मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून २ कोरोनाबाधित माता व त्यांच्या बालकांना दहाव्या दिवशी कोरोनामुक्त करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बालरोग तज्ञ डॉ. दिलीप मोरे व त्यांच्या सहकारी वैद्यकीय पथकाने त्या सर्व बालकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार केले आहेत.

आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात ९१ नवजात बालकांची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी ३१ नवजात बालकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला. त्यांनी नवजात बालकांसह त्यांच्या मातांनाही कोरोनामुक्त करण्याची यशस्वी कामगिरी पार पाडली. जिल्हा रुग्णालयाच्या या कामगिरीचे जिल्हावासीय व वैदयकीय क्षेत्रातील तज्ञांकडून कौतुक होत आहे.