मुसळधार पावसामुळे राजापूर शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान, बाजारपेठ पाण्याखाली

राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली आहे. ॲडिशनल सीईओ, एक्झिक्यूटिव्ह इंजिनीयर, सेक्शन इंजिनिअर, सरपंच इत्यादींना सोबत घेऊन ही पाहणी केली व संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.

    राजापूर – तीन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर शहर तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजापूर शहरातील मुख्य चौक तसेच बाजारपेठ पाण्याखाली आहे. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत.

    तालुक्यातील चौके तारळ हा नवीन रस्ता खचला आहे. धाऊलवल्ली तरबंदर येथे झाड पडून रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. कणेरी- डोंगर व्हाया गणेशवाडी हा रस्ता खचला असून कॉजवेला तडे गेले आहेत. कुंभवडे वाऊलवाडी येथील वसंत तुकाराम राघव यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. साखर कोंबे येथे रस्ता खचला असून पन्हळे येथील डोंगर घसरला आहे.

    कोंड तिवरे येथील श्रीकृष्ण गजानन पाध्ये यांच्या गोठयावर नारळाचे झाड मोडून पडल्यामुळे नुकसान झाले आहे. कोंड्ये तर्फे सौंदळ येथील मनेश कोंडकर यांच्या घराचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जैतापुर भुतेवाडी येथे नारळाचे झाड लाईटच्या वायर वर गेल्यामुळे लाईटचा सप्लाय बंद आहे. महावितरण कर्मचारी सप्लाय सुरू करण्यासाठी अविरत मेहनत घेत आहेत. नाटे ठाकरेवाडी येथेही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.

    राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली आहे. ॲडिशनल सीईओ, एक्झिक्यूटिव्ह इंजिनीयर, सेक्शन इंजिनिअर, सरपंच इत्यादींना सोबत घेऊन ही पाहणी केली व संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.

    19 जुलै रोजी रायपाटण गांगणवाडी येथून अर्जुना नदीत वाहून गेलेल्या विजय पाटणे यांचा मृतदेह सापडला आहे. धाऊलवल्ली आंबेलकर वाडी पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे वाहतूकीस बंद केला आहे. शीळ- दोनिवडे मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.

    अतिरेकी पावसामुळे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत.
    कोंडसर खुर्द येथील अनिता वारीक यांच्या घरामागची दरड कोसळली. सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.