राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार

जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड करताना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. सदस्यपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि चिपळूण विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी यांची वर्णी लागली. या निवडीनंतर असंतोषाला धुमारे फुटले आहेत.

    रत्नागिरी : जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड करताना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. सदस्यपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि चिपळूण विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी यांची वर्णी लागली. या निवडीनंतर असंतोषाला धुमारे फुटले आहेत.

    जाधव हे जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. अन्य काही पदे त्यांच्याकडे आहेत. असे असताना एका व्यक्तीवर कारभाराचा किती भार द्यायचा, एकाकडेच किती पदे द्यायची याचाही श्रेष्ठींनी विचार करायला हवा, अशी भूमिका असंतुष्टांनी मांडली आहे.

    जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी जिल्हा नियोजनवर जाण्यास इच्छुक होते; मात्र पदाधिकाऱ्यांची थेट नावेच जाहीर केल्याने अनेकजणांची निराशा झाली. निवड कशा पद्धतीने झाली, याबाबत काहींनी चौकशीही केली. त्यामुळे नाराज झालेल्या माजी सभापती शौकत मुकादम यांनी आपली नाराजी थेट व्यक्त केली.

    ही पदे कुणी वाटली आणि कोणाच्या आदेशाने हे समोर आले पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा पवित्राच काही ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याचे मुकादम यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्ष ही कुणाची मालमत्ता नाही. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निवड कशी केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कार्यकर्त्यांना जर किंमत नसेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.