विरोधकांचे काळीज गोठले; नाना पटोलेंचे केंद्र सरकार आणि भाजपावर टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी रत्नागिरी दौऱ्यात चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. खरेतर ही राजकारण करण्याची वेळ नाही. अडचणीत आलेल्या लोकांना मदत कशी करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. लोकांच्या जिवाशी खेळू नका, ही माझी विरोधकांना विनंती आहे. विरोधकांचे काळीज गोठले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री जमिनीवर उतरले होते. मात्र फक्त गुजरातमध्ये गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जमिनीवर तरी उतरले का? याचा शोध घ्यावा, मग टीका करणाऱ्यांना याचे उत्तर मिळेल, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

    रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी रत्नागिरी दौऱ्यात चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. खरेतर ही राजकारण करण्याची वेळ नाही. अडचणीत आलेल्या लोकांना मदत कशी करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. लोकांच्या जिवाशी खेळू नका, ही माझी विरोधकांना विनंती आहे. विरोधकांचे काळीज गोठले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री जमिनीवर उतरले होते. मात्र फक्त गुजरातमध्ये गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जमिनीवर तरी उतरले का? याचा शोध घ्यावा, मग टीका करणाऱ्यांना याचे उत्तर मिळेल, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

    पंतप्रधान फक्त गुजरातचे आहेत का?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला केलेल्या मदतीवरून पटोले यांनी पंतप्रधानांना टोला लगावला आहे. आपण गुजरातचेच पंतप्रधान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, असे पटोले म्हणाले. महाराष्ट्रावर पंतप्रधानांचे प्रेम आहे, केंद्राच्या तिजोरीत टॅक्स स्वरूपात जो पैसा जातो, त्यातला 40 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. आज राज्यातील जनता अडचणीत आहे, अशा वेळेस केंद्राने भरीव मदत करावी, त्यामुळे पंतप्रधान महाराष्ट्राला 2 हजार कोटी तरी मदत करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिवाय ते आमच्या अधिकाराचे पैसे आहेत भिक नाही, अशा शब्दात पटोले यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

    वेळ आली तर कर्ज घ्या

    नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी गरज पडल्यास कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांची मदत करा, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले. कोकणात फार मोठे नुकसान झाले आहे आणि नुकसानग्रस्तांना आपण पुन्हा उभे केले पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली नाही तरी राज्य सरकारने पुढाकार घेऊन कोकणवासियांना भरीव मदत द्यावी, असे पटोले म्हणाले.