Printing of counterfeit notes in Ratnagiri; The notes were printed in the village and brought to Thane for refund

चिपळूण : रत्नागिरीत बनावट नोटांची छपाई होत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. गावात नोटा छापून त्या ठाण्यात आणल्या जात होत्या. ठाणे पोलिसांनी या टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. या वृत्ताने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ ने कापूरबावडी येथे सापळा रचून ही कारवाई केली.

या टोळीचा म्होरका सचिन आगरे याला पोलिसांनी पकडल्यानंतर चिपळूणात बनावट नोटांची छपाई होत असल्याची माहिती समोर आली. याच्या चौकशीनंतर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. या तिघांकडून ८५ लाख ४८ हजार रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

चिपळूण कळंबट येथील सचिन आगरे याने संगणक आणि प्रिंटरच्या सहाय्याने गावातच दोन हजार रूपयांच्या बनावट नोटांची छपाई सुरू केली. दोन हजारच्या बनावट नोटा वटविण्यासाठी सचिन आगरे ठाण्यात आला होता.

सचिन आगरे याला रंगेहाथ पकडल्यानंतर चौकशीनंतर पोलिसांनी आगरेच्या मन्सूर खान आणि चंद्रकांत माने या दोघा साथीदारांना अटक केली.

बनावट नोटांचे धागेदोरे चिपळूण पर्यंत पोहचल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. स्कॅनर,प्रिंटर आणि संगणकाच्या सहाय्याने या बोगस नोटा छापल्या जात होत्या. या टोळीने या बनावट नोटा कुठे कुठे वटविल्या आहेत याचा पोलिस शोध घेत आहेत.