रिफायनरी समर्थक जि. प. सदस्याचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; माजी आ. प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला भाजपने हा दिलेला धक्का आहे, असे बोलले जात आहे. भाजपात दाखल झालेल्या शिवसैनिकांचे स्वागत करताना माजी आमदार प्रमोद जठार यांनी हा पक्षप्रवेश विकासाच्या तसेच आत्मसन्मानाच्या मुद्द्यावर असल्याचे म्हटले.

  राजापूर : रिफायनरी समर्थक शिवसेना जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांच्यासह कात्रादेवी, गोठीवरे, घोडेपोई, मिठगवाणे, बुरंबे आणि गोवळ येथील रिफायनरी समर्थकांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपला ‘अच्छे दिन’ येण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता हॉटेल गुरुमाऊली नेरकेवाडी येथील हॉलमध्ये हा समारंभ पार पडला.

  शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला भाजपने हा दिलेला धक्का आहे, असे बोलले जात आहे. भाजपात दाखल झालेल्या शिवसैनिकांचे स्वागत करताना माजी आमदार प्रमोद जठार यांनी हा पक्षप्रवेश विकासाच्या तसेच आत्मसन्मानाच्या मुद्द्यावर असल्याचे म्हटले.

  अन्य प्रवेशकर्त्यांमध्ये कात्रादेवी वाडी सागवे येथील माजी सरपंच विद्याधर राणे, बहुसंख्य स्त्री-पुरुष नागरिक सामील आहेत. गोवळ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, यांच्यासह गाव पॅनलचे सगळे सहा सदस्य भाजपामध्ये प्रवेश करते झाले आहेत.

  अपमानाचा बदला घेणारच – जठार

  माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ व जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांची हकालपट्टी ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हटले. पुराणाचा दाखला देत स्त्रीच्या अपमानामुळे झालेल्या रामायण महाभारताचा उल्लेख करून शिवलकर यांच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले.

  राजा काजवे यांना उपतालुकाध्यक्षपद

  याच कार्यक्रमात शिवसेनेतून हकालपट्टी झालेले विभाग प्रमुख राजा काजवे यांची भाजपा राजापूर उप तालुकाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.

  प्रवेशवेळी जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, उप जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, अनिल करंगुटकर, अमजद बोरकर, पंढरीनाथ आंबेरकर, श्रुती ताम्हणकर, शीतल पटेल, रवींद्र पाळेकर, उत्तम बिर्जे आदी उपस्थित होते.