आत्मविश्वास नव्हे हे तर आत्मघातकी सरकार, गेल्यावर्षीचीच मदत अजून मिळाली नाही; चक्रीवादळ पाहणी दौऱ्यात फडणवीसांचा हल्लाबोल

कोकणात सलग दुसऱ्या वर्षी मोठे नुकसान झाले. सलग दुसऱ्या वर्षी हा दौरा आहे. मात्र गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळाली नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जाहीर झालेली मदत अद्याप मिळालेली नाही. काही झाले की केंद्राकडे बोट दाखवायचे हे नेहमीचे झाले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  रत्नागिरी : महाविकास आघाडी सरकार आत्मविश्वासी नव्हे तर आत्मघातकी सरकार आहे. मागील निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत अजून मिळालीच नाही, आता तरी मदत मिळावी, अशी अपेक्षा  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर खेड येथे पोहोचले.

  गेल्यावर्षीची मदत अजून मिळाली नाही

  माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कोकणात सलग दुसऱ्या वर्षी मोठे नुकसान झाले. सलग दुसऱ्या वर्षी हा दौरा आहे. मात्र गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळाली नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जाहीर झालेली मदत अद्याप मिळालेली नाही. काही झाले की केंद्राकडे बोट दाखवायचे हे नेहमीचे झाले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मागच्या वादळात वाड्याच्या वाड्या कोसळून पडल्या. जी झाडे मोठी होण्यासाठी १५ वर्ष लागतात, त्यांना शंभर रुपये झाडामागे मिळाले, त्यामुळेच लोकांमध्ये नाराजी, नैराश्य आहे. लोकांना किमान पत्रे हवे होते, ते मिळाले नाहीत, जे लक्ष द्यायला हवे होते सरकारने तेही दिले नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

  हे सरकार फक्त आरडाओरड करण्यातच मग्न

  ते म्हणाले की, या चक्रीवादळाचा लँडफॉल गुजरातमध्ये होता. तिथे जास्त नुकसान आणि जास्त मृत्यू झाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथला दौरा केला. गुजरातला जशी मदत जाहीर केली, त्याच प्रेसनोटमध्ये उल्लेख आहे, इतर राज्यांनाही तशीच मदत केली जाईल, त्यामुळे ठाकरे सरकारला काही झाले की केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची सवय झाली आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला. जिथे सर्वाधिक नुकसान झाले तिथे मदत दिली, महाराष्ट्रालाही मदत मिळणारच आहे. पण नेहमी कांगावा करायचा आहे हेच या मंत्र्यांचे काम यातून महाराष्ट्राला मदत मिळणार नाही. हे सरकार फक्त आरडाओरड करण्यातच मग्न आहे, असे फडणवीस म्हणाले.

  वाईट झाले की केंद्राची जबाबदारी

  कोरोना महामारीमध्येही हे सरकार सपशेल नापास झाले आहे. हा आत्मविश्वास नाही तर आत्मघातकी सरकार आहे. मृत्यूचे आकडे अजूनही लपवले जात आहेत. याची काहीच गरज नाही हे आकडे कधी ना कधी तुम्हाला सांगावेच लागतील तर मग लपवता कशाला? असा सवाल त्यांनी केला. सगळे काही देऊनही परत केंद्रालाच नावे ठेवतात. चांगल झाले की आम्ही केले आणि वाईट झाले की केंद्राची जबाबदारी. ही सगळी स्क्रिप्ट रेडी आहे. दररोज उठायचे आणि हेच बोलायचे आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

  मराठा आरक्षणात केवळ वेळकाढूपणा

  फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणात केवळ वेळकाढूपणा या सरकारला करायचा आहे. फक्त मोदींजींनी द्यावे किंवा राष्ट्रपतींनी द्यावे एवढेच बोलतात. पण त्यासाठी जी काय कायदेशीर प्रक्रिया तुमचा प्रस्ताव तयार तर करा. यासाठी मागासलेपणा संदर्भातील नवीन पुरावे तयार करावे लागतील. आम्ही काहीच करणार नाही पण आम्ही फक्त मोदींना सांगत राहू, हे म्हणजे केवळ मराठा समाजाला फसवत रहायचे आहे.  ते म्हणाले की, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, भाजपची भूमिका स्पष्ट आहे.