रत्नागिरीत बुधवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन, किराणा मालासह सर्व दुकाने बंद

लॉकडाऊनच्या काळात औषधांची दुकाने, आरोग्य विषयक सेवा, आरोग्य विषयक आस्थापना पूर्ण वेळ सुरु राहतील. मात्र या आस्थापनांमधून खाद्यपदार्थ, किराणा माल, वैद्यकिय नसलेले साहित्य विक्री करण्यास परवानगी असणार नाही. किराणा मालाच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये 2 जून रोजी 12 वाजल्यापासून 9 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत जाहीर केला.

    रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या बाधित होण्याचे प्रमाण 20 टक्के असून 67 टक्क्यांच्या वर ऑक्सीजन बेड व्याप्त आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी उद्या बुधवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

    लॉकडाऊनच्या काळात औषधांची दुकाने, आरोग्य विषयक सेवा, आरोग्य विषयक आस्थापना पूर्ण वेळ सुरु राहतील. मात्र या आस्थापनांमधून खाद्यपदार्थ, किराणा माल, वैद्यकिय नसलेले साहित्य विक्री करण्यास परवानगी असणार नाही. किराणा मालाच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.

    केवळ सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुधविक्रेत्यांना घरपोच सेवा देता येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातून प्रवेश करण्यास किंवा जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात जाण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच कोविड निगेटिव्ह चाचणी किंवा ई पाससोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.