वेळास समुद्र किनाऱ्यावर अज्ञात पुरुषाचे शव, बाणकोट सागरी पोलिसांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे दोनही जिल्ह्यांत मागील दोन दिवस पूरस्थिती होती. या पूरात काही नागरिक बेपत्ता झाले. त्यामुळे या बेपत्ता लोकांपैकी हा कुणाचा मृतदेह तर नाही ना? अशी चर्चा सध्या परिसरात सुरु आहे.

    मंडणगड तालुक्यातील वेळास व साखरी दरम्यान समुद्र किनारी लाटांवर कचऱ्यासोबत एक अज्ञात पुरुषाचे शव वाहून आले आहे. दि.२३ जुलै रोजी दुपारी २ वाजता या घटनेची माहिती मिळताच बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम पीठे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळावर जावून पाहणी करीत पंचनामा केला आहे. तसेच शव ताब्यात घेवून पोस्टमार्टेम करण्यासाठी मंडणगड येथे आणण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पीठे यांनी दिली.

    वेळास समुद्रकिनारी साधारण ४ ते ५ किमी चालत जीवरक्षक यांना मदतीला घेत पोलीस घटनास्थळी गेले. त्याठिकाणी समुद्रातील कचऱ्यासोबत एक पुरुषाचे शव किनारी आढळून आले. अंगावर एकही कपडा नसलेले हे शरीर पाण्यात फुगलेल्या अवस्थेत दिसून आले. पंचनाम्यासह सर्व कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 6 / 21 कलम 174 CRPC दाखल करण्यात आले आहे. सदर पुरुषाचे वय हे २० ते २५ वर्षादरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत माहिती मिळताच संबंधित नातेवाईक यांनी बाणकोट पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन उत्तम पीठे यांनी केले आहे.

    दरम्यान, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे दोनही जिल्ह्यांत मागील दोन दिवस पूरस्थिती होती. या पूरात काही नागरिक बेपत्ता झाले. त्यामुळे या बेपत्ता लोकांपैकी हा कुणाचा मृतदेह तर नाही ना? अशी चर्चा सध्या परिसरात सुरु आहे.