कोरोना विषाणूवर आळा घालण्यासाठी, रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय…

  • या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात ऑक्सीमीटरच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच सर्दी, ताप, खोकला आदि. प्रकारची लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीची जागेवरच तपासणी केली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने ग्रामपातळीवर प्राथमिक लक्षणांची तपासणी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आशा स्वयंसेविकांमार्फत ग्रामपंचायतस्तरावर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाची लक्षणे आढळल्यास, त्या व्यक्तींना कोवीड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी लवकर पाठवणे शक्य होणार आहे.

त्यामुळे कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी आवश्यक साधने पुरवून ही योजना अमलात आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात ऑक्सीमीटरच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच सर्दी, ताप, खोकला आदि. प्रकारची लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीची जागेवरच तपासणी केली जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार आशा कार्यकर्त्यांना या पल्स ऑक्सीमीटरची खेरदी करून द्यावी, असं ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील लोकांची प्राणवायू पातळी कमी असलेल्या व्यक्तींना आशा, शिक्षक, तसेच ग्राम कृतिदलातील सदस्यांनी पुढील आरोग्य केंद्रात पाठवणे अपेक्षित आहे. परंतु या योजनेमुळे ग्रामपातळीवरील लोकांना आणि जिल्हा प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचं दिसत आहे.