चिपळूणच्या लोकमान्य टिळक वाचन मंदिरासाठी मराठी भाषा विभागाकडून अडीच हजार पुस्तके भेट

    चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे महापुरामुळे नुकसान झाले होते. या वाचनालयासाठी  महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथसंपदा भेट दिली आहे. ही ग्रंथसंपदा घेऊन जाणाऱ्या वाहनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रवाना करण्यात आले.

    वर्षा शासकीय निवासस्थानी प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या सचिव श्रीमती मिनाक्षी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मराठी भाषा विभागाशी निगडित सर्व संस्थांच्या या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच त्यांनी भेट देण्यात येणाऱ्या ग्रंथसंपदेची माहिती घेतली.

    अतिवृष्टीमध्ये चिपळूण शहरात महापुराचे पाणी शिरल्याने सन १८६४ साली स्थापन झालेल्या व १५७ वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, वाचनालयात वर्षानुवर्षे जोपासलेल्या अमुल्य अशा ग्रंथ संपदेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाचनालयातील पुस्तकांचे नुकसान विचारात घेऊन वाचनसंस्कृती  पूर्वपदावर यावी यासाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने अडीच हजार पुस्तके देण्यात येत असल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली.

    अनेक वर्षाची समृद्ध वाचन परंपरा असलेल्या या वाचनालयाला मदत व्हावी, वाचकांना पुन्हा पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावीत आणि वाचनसंस्कृती अखंडीतपणे प्रवाहीत राहावी, या हेतूने वाचनालयाला राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या कार्यालयांच्या पुढाकारातून मराठी भाषा विभागाकडून वैविध्यपूर्ण विषयांवरील मौलिक अशी अडीच हजार पुस्तके भेट देण्यात आली आहेत.