पुराच्या पाण्यात पोहणे बेतलं जीवावर; संगमेश्वर तालुक्यात दोघांचा बुडून मृत्यू

माखजन जवळच्या धामापूर घारेवाडीतील सहा तरुण भायजेवाडीतील बांधाऱ्याजवळ गेले होते. याच दरम्यान शौचास जात असल्याचे सांगून शैलेश दत्ताराम चव्हाण (३२) व केतन सुरेश सागवेकर (१८) हे दोघे बांधाऱ्याजवळच्या पाण्यात गेले. याच दरम्यान केतन सुरेश सागवेकर याचा पाय घसरला व तो पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात येताच केतन सुरेश सागवेकर हा त्याला वाचवायला गेला, परंतु तोही बुडू लागला. त्याने आरडाओरडा केल्यावर तेथे असणाऱ्या चौघांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले.

    रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आठवडाभर जोरदार पाऊस पडत आहे. नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. अशा स्थितीत पाण्याचा प्रवाह वेगवान असतांना पोहण्यासाठी उतरलेल्या सहा मुलांपैकी दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदरची घटना धामापूर घारेवाडी येथे घडली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, माखजन जवळच्या धामापूर घारेवाडीतील सहा तरुण भायजेवाडीतील बांधाऱ्याजवळ गेले होते. याच दरम्यान शौचास जात असल्याचे सांगून शैलेश दत्ताराम चव्हाण (३२) व केतन सुरेश सागवेकर (१८) हे दोघे बांधाऱ्याजवळच्या पाण्यात गेले. याच दरम्यान केतन सुरेश सागवेकर याचा पाय घसरला व तो पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात येताच केतन सुरेश सागवेकर हा त्याला वाचवायला गेला, परंतु तोही बुडू लागला. त्याने आरडाओरडा केल्यावर तेथे असणाऱ्या चौघांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले.

    या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याची खबर गावातील लोकांना समजताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. संध्याकाळी दोघांचे मृतदेह माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. प्रदीप शिंदे यांनी केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

    संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील धामापूर घारेवाडी येथे रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे हे करत आहेत.

    दरम्यान, मागिलवर्षी याच दिवशी त्याच ठिकाणी बुडून एकाचा मृत्यू झाला होता. त्याची आठवण आज ताजी झाली.  या घटनेमुळे संगमेश्वर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.