पूरग्रस्त चिपळूणवर अन्याय होऊ देणार नाही! नाना पटोले यांचे आश्वासन

आपण वैयक्तीक पातळीवर जातिनिशी लक्ष घालू आणि चिपळूणच्या जनतेवर अन्याय होणार नाही असा निर्णय घेतला जाईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी पटोले यांनी दिले. यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून भविष्यात योग्य निर्णय घेण्याच्या सूचना देऊ, असे आश्वासनही पटोले यांनी दिले.

    मुंबई : पूररेषेसंदर्भात कोणताही चुकीचा निर्णय होऊन पूरग्रस्त चिपळूणवर अन्याय होऊन देणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी गुरुवारी (ता. 23) पटोले यांची मुंबईत भेट घेतली आणि पूरग्रस्तांच्या समस्या मांडून निवेदन दिले. त्यावेळी पटोले यांनी हे आश्वासन दिले.

    यावेळी प्रशांत यादव यांनी यावेळी नाना पटोले यांना चिपळूणमधील पूरग्रस्तांच्या आणि पूरस्थितीनंतर उद्भवलेल्या समस्यांची माहिती दिली. चिपळूण शहरासाठी निळी व लाल पूररेषा निश्चित करण्याचे काम सुरू झाले होते. मात्र सध्या या पुररेषा निश्चितीच्या कामाला तत्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती तत्पुरती असली, तरी भविष्यात याबाबत फेरविचार करताना चिपळूणच्या विकासाला बाधा पोहचवणारा, इथल्या नागरिकांवर अन्याय करणारा निर्णय घेतला जाऊ नये, अशी मागणी यावेळी केली. यावर आपण वैयक्तीक पातळीवर जातिनिशी लक्ष घालू आणि चिपळूणच्या जनतेवर अन्याय होणार नाही असा निर्णय घेतला जाईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी पटोले यांनी दिले. यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून भविष्यात योग्य निर्णय घेण्याच्या सूचना देऊ, असे आश्वासनही पटोले यांनी दिले.

    यावेळी यादव यांनी यासंदर्भात पटोले यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे, की चुकीच्या पद्धतीने पूररेषा निश्चित झाल्यास चिपळूण शहराची संपूर्ण बाजारपेठच उध्वस्थ होण्याचा धोका आहे. या पुररेषेमुळे शहराचा विकास संपूर्णपणे खूंटणार आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. अन्यायकारक पूररेषेमुळे चिपळूणचे अस्तित्व धोक्यात धोक्यात येण्याची भीती आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.