मनातल्या भावना ‘त्याला’ नक्की सांगा

त्याच्या कामाचे कौतुक करायला विसरू नका. तुमच्या प्रियकराला हेच आवर्जून सांगा, की तो सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडतोय आणि त्याचे कामही तो चोख करतोय.

  तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये आहात आणि अचानक तुम्हाला एक मेसेज आला, ‘तुझ्यामुळे माझे आयुष्य खूप सुंदर झाले आहे,’ तर तुम्हाला नक्कीच छान वाटेल. तो मेसेज कुणाचा वगैरे गोष्टींचा विचार तुम्ही नंतर करालही; पण तुमचा मूड छान व्हायला तर यामुळे नक्कीच मदत होईल. अशाच गोष्टी तुमच्या प्रियकराला किंवा नवऱ्याला ऐकायला आवडतात. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीकडून अनपेक्षित प्रशंसा मिळाली, तर तुमचा दिवस खूप मस्त जाऊ शकतो. आपल्या आवडत्या व्यक्तीकडून झालेली आपली प्रशंसा नेहमीच गालातल्या गालात हसू आणते आणि त्याचा आपण लाजतच; पण मनोमन स्वीकारही करतो. दिवस तर भारी जातोच; शिवाय अचानक अनेक गोष्टींकडे पाहाण्याचा दृष्टिकोनच एकदम सकारात्मक होऊन जातो. तुमचे प्रेम नव्याने खुलेल अशा तुम्ही केलेल्या किंवा म्हटलेल्या कुठल्या गोष्टी तुमच्या प्रियकराला आवडतील.

  कामाचे कौतुक
  त्याच्या कामाचे कौतुक करायला विसरू नका. तुमच्या प्रियकराला हेच आवर्जून सांगा, की तो सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडतोय आणि त्याचे कामही तो चोख करतोय. त्याचा स्वतःच्या कामाविषयीचा आत्मविश्वास वाढेल आणि त्याचे काम तो अधिक ऊर्जेने आणि उत्साहाने करेल. यासाठीही त्याला तुम्ही केलेल्या कामाविषयीच्या कौतुकाचा फायदा होईल. यामुळे त्याला हेही समजेल, की तुम्ही त्याच्या आयुष्यातील बारीकसारीक गोष्टींकडेही लक्षपूर्वक पाहाताय. त्यामुळे त्याला स्वतःचे आयुष्यही सुंदर वाटू लागेल. आपण कुणाला तरी इतके महत्त्वाचे वाटतोय, ही भावना खूपच सुंदर आहे.

  सुरक्षिततेची भावना
  प्रत्येक प्रियकराला साहजिकच आपली प्रेयसी आपल्याबरोबर सुरक्षित असावी, किमान तिला तसे वाटावे, असे वाटत असते. सुरक्षिततेची व्याख्या म्हणजे फक्त दुसऱ्या कुणाच्या चुकीच्या वागण्यापासून आपल्याला वाचविणे इतकेच नव्हे, तर तिला हवे तसे कपडे घालू देणे, तिला हवे ते खाण्या-पिण्याची – बोलण्याची आणि राहण्याची मुभा असणे, तिच्या पद्धतीने ती तिचे आयुष्य जगत असताना दुसऱ्या कुणी ते नाकारायचा प्रयत्न केला, तर त्याविरुद्ध तिच्या बाजूने उभे राहणे यांसारख्या गोष्टींतही स्त्रीला सुरक्षितता वाटत असते. तीच मला तुझ्या सहवासात जाणवते, हे त्याला सांगितल्यावर त्यावेळी तो तुम्हाला प्रेमाने मिठीत घेतल्याशिवाय राहणार नाही.

  आयुष्यात धमाल
  तुम्हाला त्याने सांगितलेल्या विनोदावर हसू येत असेल, काही वेळा त्याच्या स्मार्ट कमेंट्सवर खळखळून हसायला येत असेल, तर त्याने केलेले विनोद तुम्हाला आवडतात, हे त्याला त्यामुळे कळेलच; पण तुम्ही हे त्याला स्वतःहून सांगितले, तर त्याला अर्थातच ते जास्त आवडेल. यामुळे फक्त तुम्हीच नाही, तर तुमचे आयुष्यही आनंदी आणि धमाल झाले आहे, हेही त्याला सांगा.

  फिटनेसवरील लक्ष
  आपल्या प्रेयसीला ‘इम्प्रेस’ करायला प्रत्येकच प्रियकराला आवडते. त्यासाठी तो काही वेळा दैनंदिन कार्यक्रमांपलिकडे जास्तीचे कष्टही घेत असण्याची शक्यता आहे. याचसाठी तो जिमला जात असेल, टेकडी चढत असेल किंवा सायकलिंग, बॅडमिंटन, ट्रेकिंग वगैरे करत असेल आणि त्याच्या फिटनेसवर विशेष लक्ष देत असेल, तर ‘तू सध्या चांगलाच फिट दिसू लागलायस’ असे त्याला नक्की सांगा. म्हणजे तो तुमच्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांकडे तुमचे लक्ष आहे आणि त्यामुळे काहीतरी फरक पडल्याचे तुम्हालाही जाणवतेय, हे पाहून त्याला नक्कीच छान वाटेल. तो अर्थातच तुमच्यासमोर फिट आणि हॉट दिसण्याचा प्रयत्न करणारच. त्याचे फक्त क्रेडिटच नाही, तर त्याच्या प्रयत्नांना दादही द्या. त्याच्या फिटनेसमुळे तो चार्मिंग दिसत असल्याचेही त्याला सांगा. तो तुम्ही केलेले कौतुक अजिबात विसरणार नाही.