मुलांची मस्ती करा ‘कंट्रोल’; वापरा ‘या’ टिप्स

मुलांवर हात उगारणे हा कोणत्याच गोष्टीवरील उपाय नाही. मुल मस्ती करत असेल तर त्याला समजावून सांगा.

  ‘माझं मूल फार मस्तीखोर आहे…अजिबात ऐकत नाही… आणि नुसते हट्ट’ अशा अनेक तक्रारी पालक आपल्या मुलांबाबतत नेहमीच करत असतात. एवढेच नाही तर अनेकदा मुलांच्या हट्टामुळे आणि मस्तीमुळे त्यांना अगदी नकोसे होते. त्यामुळे ते त्यांना कुठे बाहेर घेऊन जाणे आणि खासकरून पाहुण्यांकडे जाणे टाळतात. कधी-कधी मुलांचा हट्ट एवढा वाढतो की, त्यावर आळा घालण्यासाठी पालक त्यांच्यावर हातही उगारतात. परंतु, असे करणे योग्य नाही, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. असे करण्याचा मुलांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मुलांना समजावून सांगून त्यांची मस्ती कमी करू शकता.

  अनेक संशोधनामधून असे सिद्ध झाले आहे की, जास्तीत जास्त मुले आपल्या पालकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी असे करतात. जर दोन्ही पालक वर्किंग असतील आणि आपल्या मुलावर जास्त लक्ष देत नसतील तर त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुले असे करतात. अशावेळी मुलांच्या अशा वागण्यामुळे पालकांचा राग अनावर होऊ शकतो. पण रागवण्याऐवजी मुल नेमके असे का करत आहे?, याचे कारण समजून घेणे फायदेशीर ठरते.

  रिअॅरक्ट करू नका…
  जर मुल लक्ष वेधून घेण्यासाठी असे करत असल्याचे तुमच्या लक्षात आले, तर त्याला थोडा वेळ द्या. लक्ष ठेवा की, मुले स्वतःला किंवा इतर गोष्टींना नुकसान तर पोहोचवत नाही ना? याउलट जर त्यांनी एखादी चांगली गोष्ट केली तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांचे कौतुक करा. त्यामुळे मुल हट्ट आणि मस्ती करण्याऐवजी चांगल्या गोष्टी करण्यावर जास्तीत जास्त भर देईल.

  त्यांच्यावर हात उगारू नका
  मुलांवर हात उगारणे हा कोणत्याच गोष्टीवरील उपाय नाही. मुल मस्ती करत असेल तर त्याला समजावून सांगा. जर तुम्ही त्यांना मारहाण केली तर कदाचित ते त्यावेळी मस्ती करणे बंद करतील पण त्या गोष्टीचा त्यांच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

  प्रेमाने समजावून सांगा
  मुलांना शांतपणे आणि प्रेमाने समजावून सांगा की, तो जी मस्ती करत आहे किंवा ज्या पद्धतीने वागत आहे. ते का चुकीचे आहे. कदाचित एकदा सांगून मुलांना त्या गोष्टी समजणार नाहीत पण तुम्हीही त्या गोष्टी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा.

  मुलांना बिझी ठेवा
  मुलांना कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये बिझी ठेवा. मुले नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी फार उत्सुक असतात. त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यांना खेळायला देखील फार आवडते. त्यांच्या या गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्या आवडीनुसार, त्यांना एखाद्या अॅक्टिव्हिटी क्लासमध्ये पाठवा. यामुळे त्यांची ऊर्जा चांगल्या ठिकाणी वापरली जाऊ शकते. तसेच त्यांना काहीतरी नवीन शिकायला देखील मिळू शकते.