‘या’ गोष्टी करा; मिळेल आदर आणि प्रेम!

न तुटणाऱ्या नात्यांचा आधार असतो जिव्हाळा आणि परस्परांची काळजी घेण्याची ओढ. प्रेम, जिव्हाळा कोणाला नको असतो, ती तर प्रत्येकाचीच गरज असते. प्रेम आणि जिव्हाळाच लोकांना एकत्र आणतो आणि निर्माण होतात सुंदर नाती. लोकांचे प्रेम मिळविण्यासाठी पुढील काही गोष्टी करुन आनंदी जीवन जगा.

सर्वांत महत्त्वाची आणि मुलभूत गोष्ट असते ती म्हणजे तुमचा खरेपणा. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला सादर करा. इतरांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण यातील सत्य जेव्हा समोरच्या व्यक्तीला ज्ञात होईल तेव्हा तुम्हाला मोठ्या मानसिक संकटाला सामोरे जावे लागेल. यामुळे तुम्ही जसे आहात तसे आणि खरेपणाने स्वतःला सादर करा.

क्षमाशील रहा, इतरांचा विचार करा आणि सौजन्यपूर्ण वागा. या तीन गोष्टींचाच मुख्यतः अनेक जणांमध्ये अभाव असतो. इतरांबद्दल असलेली तुमची क्षमाशीलता, दयाळूवृत्ती या गोष्टी त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी गरजेच्या असतात.

इतरांचे वेळोवेळी कौतुक करण्याची सवय ही तुम्हाला अनेक लोकांच्या जवळ घेऊन जाते. समोरच्या व्यक्तीचे तुम्हाला काय आवडते आणि तुम्ही त्यांच्या कुठल्या गोष्टीवर प्रेम करता हे वेळोवेळी त्या व्यक्तीला सांगत राहा, त्याच प्रकारचा मोबदला तुम्हाला मिळेल हे निश्चित. असे केल्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्या जवळ येते, कारण तुम्ही केलेल्या त्यांच्या कौतुकामुळे ते आनंदी झालेले असतात.

तुम्ही जेव्हा तुमच्या काही मित्रांबरोबर किंवा कार्यालयातील सहकाऱ्यांबरोबर असता, तेव्हा त्या प्रसंगावेळचा मूड तुमच्यामुळे खराब होणार नाही याची काळजी घ्या. मित्रमंडळींच्या विविध गटांचा भाग होण्यासाठी हे आवश्यक असते. तसेच, तुम्ही इतरांच्या मतांनाही महत्त्व देता हे दिसल्यामुळे तेही आनंदी होतात. यातूनच त्यांचा विश्वास संपादन करा आणि प्रेमाचे हकदार व्हा!

दुसऱ्याच्या मताचा आदर करण्याची कृती ही इतरांचे प्रेम मिळविण्यासाठी महत्त्वाची ठरते. एखाद्या विषयाबद्दल समोरच्याचे काय मत आहे ते नीट समजून घ्या आणि त्यानंतरच तुमचे मत मांडा. यातूनच कुठल्याही गोष्टीबद्दल तुमच्याशी बोलण्याचा आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीमध्ये तयार होईल आणि कसल्याही बंधनाशिवाय ती व्यक्ती तुमच्याशी संवाद करू शकेल.

तुमच्यासाठी जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा संपादन करण्यासाठी वरील मुद्दे तुम्हाला निश्चित मदत करतील यात शंकाच नाही.