भावनांना घाला कुंपण; ओझे करा हलके

ऑफिसात झालेले भांडण, रिक्षावाल्याशी झालेली बाचाबाची किंवा वाटेत पंक्चर झालेली गाडी, या सगळ्या गोष्टींचा राग बरेच जण घरी आल्यानंतर बायको अथवा मुलांवर काढताना दिसतात. अलीकडच्या काळात हे चरित्र प्रत्येक घरातील झाले आहे. ऑफिसात झालेले भांडण किंवा रस्त्यात गाडीचे चाक पंक्चर झाले यात घराच्या मंडळीची चूक आहे काय? हाच प्रश्न जर स्वत:ला विचारला तर याचे उत्तर नक्कीच ‘नाही’ असे येईल. यासाठी आपल्या भावनांवर आवर घालण्याची गरज आहे.

ओझे करा हलके

अनेक लोक कोणत्या ना कोणत्या अव्यक्त भावनांच्या ओझ्याचा भार वाहतांना दिसतात. परंतु त्या भावना कोणत्याहेत हेच त्यांना उमगत नाही. आजच्या धावपळीच्या युगात कोणी सुखी नाही, असे आपण म्हणतो. दु:ख़, निराशा, राग, भीती तसेच अपराधी भावना यांचा भडीमार काही जण स्वत:च्या कुटुंबियांवर करून वैवाहिक जीवन अस्थिरता निर्माण कर‍त असतात. भावना या नेहमी दु:ख देणार्‍या असतात, त्यांचे भांडवल करून ते इतरांना दु:ख देत असतात. परंतु यांचे त्यांना भान नसते. बाहेरचा सगळा राग ते घरातील मंडळीवर काढत असतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यापेक्षा त्या रागाचे खरे स्वरूप लक्षात घेणे आवश्यक आहे.

भावनांचा करा निचरा

घरातील शांतता भंग करणार्‍या भावनांचा निचरा योग्य पध्दतीने होणे गरजेचे आहे. भावनांचे स्वरूप लक्षात आल्याशिवाय त्यांच्यावर उपाय करणे अशक्य आहे.

आनंद, प्रेम, राग, आपुलकी, निंदा, भीती, निराशा या प्राथमिक स्वरूपाच्या भावना असून त्यांना किती वेळ द्यावा, हे प्रत्येकाने आपापले ठरविले पाहिजे. आपल्या मनातील भावनांना आपण स्वत:हून वाट करून दिली पाहिजे, परंतु त्या आपल्याच घरातील मंडळीवर शब्दांचा मारा करून मोकळ्या केल्या पाहिजेत, हे आपल्याला कुणी सांगितले. आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होतो, अशा गोष्टींकडे स्वत: दुर्लक्ष केले पा‍‍हिजे.

तसेच आपल्याला ज्या व्यक्तीपासून अपत्यक्षरित्या मानसिक त्रास पोहचत असेल अशा व्यक्तीला भेटून त्याच्याविषयी भावना व्यक्त केल्या पाहिजे. मात्र त्यांच्याशी बोलत असताना भावनांच्या प्रवाहात वाहून जाता कामा नये. केवळ ज्या कामासाठी आला आहात तोच विषय हाताळा. जर आपल्याला तोंडी बोलण्यात भीती वाटत असेल तर आपल्या मनातील भावनांना कागदावर शब्दरूप द्या. भावनांच्या मागचा मागोवा घ्या. एका खोलीत शांत बसा व विचार करा. एखाद्या विश्वासू मित्राला अथवा आपल्या बायकोला आपल्या स्वत:च्या मनातील भावना सांगा. जर काहीच कळेनासे होत असेल तर मानसतज्ज्ञाशी चर्चा करा.