होणाऱ्या बायकोला चुकूनही विचारू नका ‘हे’ प्रश्न

होणाऱ्या नवऱ्यामार्फत मुलीला हा प्रश्न सरार्स विचारला जातो. अर्थात त्यामागे त्यालाही काळजी असते हे खरे असले तरी हा प्रश्न विचारण्याऐवजी त्या मुलाने स्वत: ओळखावे की या मुलीचे...

    लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो. हा निर्णय घेतांना सल्ले देणारे अनेक असतात. प्रत्येक जण आपापल्या अनुभवातून सल्ले देतो (कुणी मागीतले नसले तरीही). अशावेळी मुलांपेक्षा मुलींच्या मनाचा गोंधळ आणखीनच वाढतो. कधी कधी तर आपले लग्न लावल्या जात आहे की आपल्याला एखादी शिक्षा ठोठावली जात आहे असे भासायला लागते. अशावेळी होणाऱ्या नवऱ्याची एक मोठी जबाबदारी असते. ती म्हणजे मुलीचा हा गोंधळ किमान त्याच्याकडून तरी वाढू देऊ नये. मग त्यासाठी नेमके काय करावे? असा  प्रश्न पडणे साहजिकच आहे. यावर एक सोपा उपाय आहे. काही गोंधळात टाकणारे प्रश्न तिला विचारणे टाळायला हवे.

    जाणून घेऊया असे कोणते प्रश्न आहेत जे एखाद्या मुलाने त्याच्या होणाऱ्या बायकोला विचारणे टाळावे.

    लग्नासाठी तयार आहेस ना? : लग्न हा आयुष्यातला असा एक निर्णय असतो जो प्रत्येकजण दडपणाखाली घेतो. भले तो प्रेम विवाह असो की ठरवून केलेलं लग्न असो, पुढे काय होईल किंवा आपला संसार नेमका कसा असले याबद्दल प्रत्येकाच्या मनात शंका असते. खासकरून मुलींच्या मनात शंकांचं वादळ उठलेलं असतं. कारण त्या आपल्या माणसांना सोडून कायमसाठी दुसऱ्याच्या घरी जाणार असतात. अशावेळी साहजिकच त्या थोड्या तणावात असणे साहजिक आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारून त्यांना अधिक गोंधळवू नये व त्यांच्या मनावरचं दडपण वाढवू नये.

    जेवण बनवता येतं का? : हा प्रश्न काहीसा गरजेचा आहे आणि तितकासा गरजेचा नाही असंसुद्धा म्हणू शकता. हा प्रश्न यासाठी गरजेचा नाही कारण जर तिला जेवण बनवायला येत नसेल तर ती पुढे जाऊन शिकून घेईल. जर एखाद्या मुलीला जेवण बनवता येत नाही याचा अर्थ हा तर नाही की ती चांगली जोडीदार होऊ शकत नाही, ती संसार नीट करू शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न विचारणे टाळावे. आजकालच्या मुलींना सहसा जेवण बनवायला येत नसते. त्यांना साधे काही पदार्थ येत असतात. पण यावरून मुलगी संसार करू शकत नाही असा समज बनवणे चुकीचे आहे कारण तिला तिच्या करियरमुळे, शिक्षणामुळे घरकाम शिकण्यास वेळ मिळालेला नसू शकतो.

    लग्नानंतर वजन कमी करशील ना? : हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे आणि हा प्रश्न कोणत्याही मुलीच्या मनाला दुखावू शकतो. वजन जास्त असलेल्या कोणत्याही मुलीला तिच्या वजनावरून बोलू नये वा तिला त्याबद्दल प्रश्न विचारू नयेत. तिलाही कळत असते की आपले वजन जास्त आहे पण अशावेळी ती ज्या घरी जाणार आहे तेथील लोकांनीच तिला असे प्रश्न केले तर तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो की या लोकांना मी खरंच आवडलेली नाहीये का? हा प्रश्न तिचा लग्नातील उत्साह कमी करू शकतो. तिच्या आनंदावर विरजण पाडू शकतो.

    माझ्या आईशी नीट वागशील ना? : होणाऱ्या नवऱ्यामार्फत मुलीला हा प्रश्न सरार्स विचारला जातो. अर्थात त्यामागे त्यालाही काळजी असते हे खरे असले तरी हा प्रश्न विचारण्याऐवजी त्या मुलाने स्वत: ओळखावे की या मुलीचे माझ्या आईशी ट्युनिंग कसे असेल. तरी अनेकदा पहिल्यांदा हा प्रश्न विचारल्यास मुली तो मनावर न घेता, “मी जुळवून घेईन” असे सकारात्मक उत्तर देतात. पण असे सकारात्मक उत्तर मिळूनसुद्धा मनात शंका असल्याने अनेक नवरे लग्नाआधी खूप वेळा हा प्रश्न सारखा सारखा विचारतात. त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांना मुलीबद्दल शंका नसून, शंका त्यांच्या मनातच आहे.