‘या’ गोष्टी देतात नाते अडचणीत आल्याचे संकेत

नात्यांमध्ये वाद होत असतात. पण त्या वादाचे कारण शोधा आणि वाद दूर करण्याचा प्रयत्न करा. सर्वातआधी हे जाणून घ्या की, दोन व्यक्तींमध्ये वाद झाला असेल आणि एका वाद घालत असेल तर दुसऱ्याने शांत रहावे.

  आपणा सर्वांच्या आयुष्यात काही नाती फार खास असतात. प्रत्येक नात्यात काहीना काही कारणांनी छोट्या-मोठ्या तक्रारी होत असतात. पण ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करत असाल आणि त्याच्यावर विश्वास करत असाल अशा व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल झाला तर तुम्हाला विचित्र वाटत असतं. अशावेळी तुम्हाला काही कळत नसते आणि तुम्ही चुकीचे निर्णय घेता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये खालील काही बदल दिसत असतील तर समजा तुमचे नाते बिघडतेय.

  वागण्यात अचानक बदल
  व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होणे हा नाते अडचणीत येण्याचा संकेत आहे. पार्टनरचे तुमच्या बोलण्याकडे लक्ष नसणे. गंभीर गोष्टी ऐकूनही न ऐकल्यासारखे करणे, तुमच्या प्रश्नांवर उडवा-उडवीची उत्तरे देणे तसेच सतत चिडणे इत्यादी. याप्रकारची लक्षणे दिसत असतील तर नाते अडचणीत आहे असे समजा.

  प्रत्येक गोष्टीत लुडबूड करणे
  तुमचे बोलणे लपून ऐकणे, तुमच्या व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर लक्ष ठेवणे. तुमच्या ई-मेलवर लक्ष देणे हेही तुमचे नाते चुकीच्या मार्गाने जात असल्याचा संकेत आहे. अशावेळी त्या व्यक्तीसोबत रागाने वागण्यापेक्षा त्या व्यक्तीसोबत प्रेमाने आणि शांततेने बोलायला हवे.

  सतत भांडत राहणे
  जर तुमचा पार्टनर छोट्या छोट्या गोष्टींवरुन तुमच्याशी भांडत असेल, तुम्हाला टोमणे मारत असेल तर या नात्यामध्ये दरी निर्माण होत असल्याचं समजा. विनाकारण चिडचिड करणे तेव्हाच होतं जेव्हा समोरच्यावर ती व्यक्ती रागावलेली असते. त्यामुळे सर्वातआधी ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा की, तुमच्या पार्टनरला कोणती गोष्ट खटकते आहे.

  विनाकारण वाद
  नात्यांमध्ये वाद होत असतात. पण त्या वादाचे कारण शोधा आणि वाद दूर करण्याचा प्रयत्न करा. सर्वातआधी हे जाणून घ्या की, दोन व्यक्तींमध्ये वाद झाला असेल आणि एका वाद घालत असेल तर दुसऱ्याने शांत रहावे. प्रत्येक गोष्ट तर्क-वितर्क आणि वाद करू नका. कधी कधी गोष्टी ऐकून घेणेही चांगले असते. सोबतच एकमेकांच्या कमजोरीची खिल्ली उडवू नका आणि वाद होत असताना अशा गोष्टी काढूही नका.

  कसे वाचवावे नाते?

  जर नात्यामध्ये असुरक्षिततेची भावना येत असेल आणि नातं कोणत्याही स्थितीत वाचवायचे असेल तर हे सगळे का होते याचे कारण शोधा. तुमच्या पार्टनरच्या समस्येचे कारण तुम्ही तर नाही ना? आपल्या सवयी, स्वभाव आणि लाइफस्टाइलवर नजर टाका. तुमचे काही चुकतेय का? याचा विचार करा. तुमच्या सवयींनी तर तुमच्या पार्टनरला असुरक्षित जाणवून दिले नाही ना? कारण शोधल्यास होऊ शकते की, तुमच्या पार्टनरच्या अशा वागण्याला तुम्हीच जबाबदार असू शकता. कारण शोधल्यावर काही गैरसमज असतील तर दूर करुन नातं वाचवलं जाऊ शकतं.