‘असे’ गुण असलेल्या पुरुषांच्या प्रेमात स्त्रिया हमखास पडतात!; मग ते कोणत्याही वयाचे असो

समोरची स्त्री बोलतच असते, बोलतच असते आणि तुम्ही ऐकल्यासारखं दाखवत असता. मनात बाहेरच्या जगातले विषय सुरू असतात आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण. ती नेमकं काहीतरी विचारते आणि तुम्ही कॅच आऊट होता कारण तुम्हाला माहितच नसतं तिनं काय विचारलं.

एखाद्याचे राहणीमान किंवा दिसणे त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या केवळ २७ टक्केच प्रभाव टाकत असतो इतर ७३ टक्के प्रभाव हा त्याच्या स्वभाव, सवयी आणि विचारांचा असतो, त्यामुळे फक्त रंग रूप पाहून जर कुणी एखाद्याच्या प्रेमात पडत असेल तर ते नातं चिरकाळ टिकणे अशक्य आहे. मग समाजातली एक दुसरी बाजू पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. ती म्हणजे पुरुष दिसायला फार रुबाबदार नाही महिलेपेक्षा वयानेही जास्त आहे तरी तीला तो इतका का आवडतो? असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर हा लेख पूर्ण वाचा. यात तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.

संभाषण हे जर कौशल्य असेल तर बहुतांश पुरुषांना हे कौशल्य अवगत नसतं. मैत्रीण असो की बायको किंवा एकूणच महिलावर्गासोबत बोलताना पुरुषवर्गाकडून ज्या अक्षम्य चुका घडतात त्यामुळे नात्यात अंशकालीन ते दीर्घकालीन किंवा कायमचेच परिणाम होतात.

बोलता बोलता तुमची बायको किंवा प्रेयसी, मैत्रीण चिडून गप्प होत असेल, बोलता बोलता तुमचे खटके उडत असतील तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

‘तुला नं कळतच नाही मी काय बोलतेय ते, अरे मी काय बोलतेय तू काय उत्तर देतोयस?’, ‘मी काहीतरी बोलतेय आणि तुझं लक्षच नाहीये?’ ही आणि अशा प्रकारची वाक्य तुम्ही तुमच्या बायको, मुलगी, मैत्रीण किंवा समस्त स्त्री जातीतल्या कोणत्याही नात्याकडून ऐकत असाल, तर तुम्हाला खरंच भानावर येण्याची गरज आहे.

देवानं स्त्री बनवली तेव्हा बहुदा शब्दांचं पिंप सांडलं असणार आणि पुरूष नावाचा जीव बनवला तेव्हा शब्दांबरोबरच ऐकण्याचं पिंपही तळाशी गेलेलं असणार. तर मित्रांनो, मुळातच तुमच्याकडे जे नाहीये त्याचा किल्ला तुम्हाला लढवायचा आहे. बाईमाणसाशी बोलणं किती कठीण असतं हे ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ असं प्रकरण असतं.

ऐका, ऐका आणि नीट ऐका-

कसंय, ऐकणे ही संभाषणाची गुरूकिल्ली आहे. तुम्ही नीट ऐकलं की तुम्हाला योग्य उत्तर देता येतं. त्यामुळे समोरची स्त्री काय बोलतेय हे दोन्ही कानांनी अगदी नीट ऐका. नीट म्हणजे कसं? तर समजा तुम्हाला बायकोनं सांगितलं की मला शॉपिंगला यायचा मूड नाही. तर नाहीचा अर्थ इथे चल लग्गेच जाऊया शॉपिंगला असाच बहुतेकदा असतो. त्यामुळे व्याकरणानं सांगितलेले नियम स्त्रियांशी बोलताना लावायचे नाहीत हा पहिला सुवर्ण नियम.

भाषेचे त्यांचे असे स्वतंत्र नियम असतात, ते जाणून घ्या. ‘हो’चा अर्थ (चिडलेला) नाही असाही असू शकतो. काय करायचं जेवायला? याचा अर्थ हॉटेलमधे जाऊया किंवा मागवूया असा असण्याच्या शक्यता असतात.

उत्तम श्रोता होणं ही पहिली पायरी आहे. बेसावधपणे प्रतिक्रिया देऊ नका. समोरची स्त्री नेमकं काय बोलतेय हे समजून घेऊन पुरुषाने प्रतिक्रिया दिली तर त्यानंतरच्या समस्या उद्भवणार नाहीत.

भलते प्रश्न विचारू नका

स्त्रियांना प्रश्नांची ॲलर्जी असते. जितके जास्त प्रश्न  तुम्ही विचारलं तितकीच जास्त चिडचिड तुम्हाला सहन करावी लागेल. विशेषत: जेव्हा तुम्ही एखादीकडे भावी गर्लफ्रेंड म्हणून बघत असता तेव्हा तर विशेष खबरदारी घ्या. काहीतरी प्रश्न विचारत बसायचे नाहीत. यानं नात्याला अकाली ब्रेक लागू शकतो आणि तुम्हाला आयुष्यभर कळतही नाही की आपलं नेमकं काय चुकलं?

अनेकजण ही चूक वारंवार करतात आणि मग इतक्या भावी गर्लफ्रेंड मुकाटपणे निघून जातात की एकप्रकारचा न्यूनगंड येऊ शकतो. मात्र आपलं काय चुकलं हे कधीच कळत नाही.

उदाहरणार्थ, तुमची मैत्रीण सिनेमाला गेल्यावर पॉपकॉर्न घेऊया म्हणाली की, गपचूप रांगेत जाऊन उभं रहायचं. उगाच कॅरमल का सॉल्टेड? बिग टब की मिडीयम? पाणी पण घेऊ का ? असे प्रश्न विचारत बसायचे नाहीत.

समोरची मुलगी बोलत असताना तुम्ही नुसतं ऐकायचं असतं. एकच गोष्ट दहादा ऐकली तरीही अकराव्यांदा सुद्धा ती तितक्याच इंटरेस्टनं ऐकणं यातच हित आहे हे लक्षात घ्या.

हे संभाषणातलं एक निसरडं वळण आहे. होतं काय, की समोरची स्त्री बोलतच असते, बोलतच असते आणि तुम्ही ऐकल्यासारखं दाखवत असता. मनात बाहेरच्या जगातले विषय सुरू असतात आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण. ती नेमकं काहीतरी विचारते आणि तुम्ही कॅच आऊट होता कारण तुम्हाला माहितच नसतं तिनं काय विचारलं.

 

 

म्हणजे ती एखाद्या सिनेमाविषयी बोलता बोलता अचानकच तुमच्या शर्टच्या ब्रॅण्डविषयी काहीतरी विचारू शकते. स्त्रियांना देवानं दिलेलं हे वरदान आहे त्या जगातल्या कोणत्याही विषयावरून कोणत्याही विषयावर हनुमान उडी मारून पुन्हा पाचव्या वाक्याला मूळ विषयावर येऊ शकतात.

दुर्दैवानं ही जी खास चिप आहे; ती स्त्रीवर्गाला वाटून झाल्यावर संपल्यामुळे पुरूषांकडे ही दैवी शक्ती नाही. जे आपल्याला जमत नाही ते अजिबातच करायचं नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे मग एकच मार्ग उरतो, समोरच्या स्त्रीचं बोलणं काळजीपूर्वक टिपकागदासारखं टिपत रहाणं.

हे झालं समोरासमोर होणार्‍या संभाषणाविषयी. अलिकडे मोबाईल किंवा सोशल मिडियावरही संभाषण करावं लागतं. तिथेही काळजी घ्यायलाच हवी हे लक्षात ठेवणेही गरजेचे आहे.