दारासमोरचं तुळशीचं रोप जगतंच नाही ‘हे’ असू शकते कारण; जाणून घ्या

पूर्वीच्या काळी स्त्रियांनी तुळशीला जल अर्पण करून, तिची पूजा करून, प्रदक्षिणा घालण्याची प्रथा होती. यामागील कारण हे की तुळस इतर झाडांपेक्षा अधिक प्रमाणात प्राण वायू देते.

  हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. तुळस – एक अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त औषधी वनस्पती.  आपल्या आरोग्यासाठी तुळस किती महत्त्वाची आहे हे आता पाश्चात्य लोक सुद्धा मान्य करतायत. पूर्वीच्या काळी स्त्रियांनी तुळशीला जल अर्पण करून, तिची पूजा करून, प्रदक्षिणा घालण्याची प्रथा होती. यामागील कारण हे की तुळस इतर झाडांपेक्षा अधिक प्रमाणात प्राण वायू देते.

  सर्दी खोकला यावरचं एक गुणकारी औषध, त्वचेसाठी उपयुक्त, ऑक्सिजन जास्त प्रमाणात देणारं हे रोप आपण अगदी हौसेने लावतो, पण ते रोप फार जगत नाही किंवा त्याची पाने काळी किंवा जांभळी पडतात आणि झाड मारून जातं. यामागे कुठलीही अंधश्रद्धा नाही, त्यामुळे आपल्या घरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झाला असेल का हा विचार मनातून अगदी काढून टाका.

  या मागे कुठली करणं असू शकतात ते जाणून घेऊया 

  १) कुंडी/वृंदावन –

  तुळशीच्या झाडाची इतर झाडांप्रमाणे किंवा त्याहून जरा जास्तं काळजी घ्यायला लागते. म्हणूनच आपण वृंदावन किंवा तुळस  लावणार आहोत ती कुंडी कशी आहे, तिची क्वालिटी कशी आहे यावरही रोपाचं आयुष्य अवलंबून असतं.

  २) बीज –

  तुळशीचं बीज कसं आहे त्यावर सुद्धा तुळशीचं आयुष्य निर्भर करतं. त्यामुळे बीज विकत घेताना योग्य ती काळजी घेऊन बीज घ्या. ऑनलाइन बीज विकत घेणार असाल तर आधी संपूर्ण माहिती काढून घ्या. फसवा फसवीचे प्रकार घडण्याची शक्यता आहे.

  ३) माती –

  तुळशीला पोषकतत्वे अधिक असलेली व जास्त पाणी शोषून न घेणारी माती लागते. त्यामुळे आपल्या जवळच्या नर्सरीत जाऊन योग्य ती माती घेऊन या. आपल्या घराच्या आसपास जिथे तुळशीची रोपं आपोआप वाढलेली दिसतील तिथली माती सुद्धा तुम्ही घेऊ शकता.

  ४) पाणी –

  तुळशीला जास्त पाण्याची गरज नसते. त्या रोपाला अर्धा पेला पाणी घातले गेले पाहिजे. अतिरिक्त पाण्याने तुळशी मरते किंवा पाने जांभळी पडतात.

  ५) सूर्यप्रकाश –

  कोणत्याही झाडाला आपले अन्न तयार कारण्यासाठी आणि योग्य वाढीसाठी सूर्यप्रकाश लागतोच. शक्यतो सकाळचे कोवळे ऊन आणि तिन्ही सांजेचे उतरते ऊनच ज्या ठिकाणी पडते तिथे तुळशी लावावी.

  तुळशीला अतिरिक्त सूर्यप्रकाशाची सुद्धा आवश्यकता नसते. त्यामुळे आपली तुळशी सतत वाळत असेल, तर ती दिवस भर रणरणत्या उन्हात असते का ते बघा आणि जागा बदला.

  महत्वाची काळजी  ही घ्या, की जर तुम्ही रोप खिडकी जवळ लावणार असाल तर सूर्यप्रकाश आणि तुळशीमध्ये काच यायला नको. याने उन्हाची तीव्रता वाढेल व रोप कोमेजून जाईल. याच प्रमाणे हिवाळ्यात सुद्धा काच जास्त गार होते, त्यामुळे तुळशीच्या रोपाला जास्त गारवा मिळून रोप मरते.