मोबाईल नोटोफिकेशन ऑन आहे?; मग तुमचे मानसिक आरोग्य आहे धोक्यात!

मित्र-मैत्रिणींच्या किंवा ओळखीच्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यामुळे दिवस-रात्र ऑनलाईन असणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे

  नोटीफिकेशनची रिंगटोन वाजली, की न चुकता मोबाईल बघायचा अशी सवय तुम्हालाही आहे का? पण ही, नुसती सवय नाही, तर मनोविकार आहे. या आजाराचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात ते जरा जाणून घेऊया…
  एखाद्या अॅपचे नोटीफिकेशन आले, की कुणाचा मेसेज आला आहे? हे बघण्यासाठी हातातले काम टाकून आधी मोबाईल बघितला जातो. अगदी रात्री-अपरात्री उठूनही नोटीफिकेशन बघितले जाते. काही दिवसांनी तर, नोटीफिकेशन आले नसेल तरीही मोबाईल सतत तपासत राहण्याची सवय जडते. मेसेज नाही आला म्हणून अस्वस्थ वाटू लागते. ही साधीसुधी सवय नसून याला

  ‘नोटीफिकेशन एन्झायटी’ म्हटले जाते. हा मनोविकार जडलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याचे मनोविकारतज्ज्ञ सांगताहेत. 18 ते 35 या वयोगटातल्या तरुणांचे प्रमाण यात अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

  सवय बदलते आजारात
  मित्र-मैत्रिणींच्या किंवा ओळखीच्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यामुळे दिवस-रात्र ऑनलाईन असणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. एखाद्या वेळेस नेटवर्क नसल्यामुळे नोटीफिकेशन न मिळाल्यास काही मंडळी उताविळ होतात.

  नोटीफिकेशन आल्याचे कळल्यास लगेच त्यावर रिप्लाय देण्यासाठी आतुर होत असतात. लाईक आणि कमेंट्सच्या विश्वात रमलेली ही मंडळी त्याच्या आहारी कधी जातात ते कळतही नाही. सोशल मीडियावर चाललेल्या घटना आपल्या नजरेतून सुटू नयेत, म्हणून नोटीफिकेशन सतत बघितली जातात. लाईक आणि कमेंटमध्ये आनंद शोधणाऱ्या मंडळींच्या आयुष्यात नोटीफिकेशनला जास्त महत्त्व असते. सोशल मीडियाला एवढे महत्त्व देणे चुकीचे आहे. ही उत्सुकता दुसऱ्या कामांमध्ये वळवण्यासाठी अनेक पर्याय आहेत’, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात.

  रिंगटोन्सची भर
  प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी रिंगटोन ठेवण्याचा प्रकार सध्या पाहायला मिळतोय. यामुळे कोणत्या व्यक्तीने मेसेज केला असेल हेही ओळखता येते. विविध सोशल मीडिया अॅप्ससाठी वेगळ्या रिंगटोन्स ठेवल्या जातात. जेणेकरून कोणत्या अॅपवरून कोणाचा मेसेज आला असेल हे ओळखता येते. रिंगटोन्स वाजल्यावर ताबडतोब मेसेज बघण्यासाठी सगळे उतावीळ होतात. यामुळे कामावर लक्ष केंद्रित न होणे आणि निद्रानाश असे त्रास संभवतात, असे तज्ज्ञ सांगतात.

  उपाय महत्त्वाचा
  दुसऱ्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेणे हा मानवी स्वभाव आहे. याचे सवयीत रुपांतर झाले की, ‘नोटीफिकेशन एन्झायटी’सारख्या मनोविकारांना सामोरे जावे लागते. स्वत:च्या जीवापेक्षा आणखी काहीही महत्त्वाचे नसते हे तरुण मंडळींच्या लक्षात यायला हवे. सगळ्या अॅप्सचे नोटीफिकेशन बंद करणे हा एकमेव उपाय यावर आहे.