नाम चांगले चांगले

नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले।। कपिकूळ उद्धरले मुक्त केले राक्षसा ।।

 नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले।।

कपिकूळ उद्धरले मुक्त केले राक्षसा ।।
 
 
नामाची अनुभूती घेण्याकरता एका अखंड नामस्मरणाव्यतिरिक्त दुसरी कसलीच साधना करू नये. केवळ अष्टौप्रहर नामातच दंग रहावे म्हणजे नामाची अनुभूती प्राप्त होईल अशी इच्छा देखील मनात न बाळगता निरपेक्ष वृत्तीने नाम घेत रहावे. जेव्हा आपल्या सर्वांगात नाम भिनते आणि आपोआपच आपल्या मुखात येऊ लागते तेव्हा तीच नामाची खरी अनुभूती आहे असे समजावे. नाम घेण्यासाठी कोणतेच प्रयत्न अथवा कष्ट घ्यावे लागत नाहीत की कर्मकांडाचे कसले सोपस्कारही करावे लागत नाहीत. फक्त नाम अखंडपणे घेण्याचा प्रयत्न करावा की नाम सहजपणे अंगात मुरते, मुखात खेळते आणि एकाक्षणी कोणत्याही प्रयत्नाशिवाय ते मनानेच आतल्याआत होऊ लागते.
        प्रत्येक श्वासागणिक नाम घेतले जाते. अशी अवस्था जेथे येते तेव्हा मनुष्य पूर्णपणे नाममय होऊन जातो. त्याला स्थळकाळाचाच नव्हे तर आपल्या देहाचाच विसर पडतो. `मी कोण आहे’ हा प्रश्न त्याला पडत नाही. कारण भगवंताच्या अस्तित्वात तो पूर्णपणे एकरूप होऊन गेलेला असतो हाच खरा नामाचा अनुभव होय. अशाप्रकारे भगवंताच्या नामाचा नाद लागला की प्रापंचिक दुःखाची जाणीवच नाहिशी होते. दुःखाची, संकटांची भीती च नाहीशी होते. कारण भगवंताच्या नामाचा भक्कम आधार आपल्यापाशी असतो. काळोख्या रात्री जसा एखाद्या छोटय़ाशा काठीच्या आधाराने आपल्याला ज्ञात होतात तद्वतच नामाच्या आधाराने आपल्याला प्रपंचातील मोह, लोभ, वासना इत्यादी विषयांचे खाचखळगे ज्ञात होतात आणि मन आपोआपच त्यापासून दूर जाते, अलिप्त होते.
भगवंताचे नाम इतके पवित्र आहे की चुकून जरी कोणी नाम घेतले तर ते घेणाऱ्याला पुण्य मिळतेच असे असताना नित्य नियमाने भगवंताचे नाम जर कोणी घेत असेल तर त्याचे पुण्य हे प्राप्त होणारच आणि पाप ही नष्ट होते.
काही लोक अशी शंका घेतील की आम्ही तर नेहमी नाम घेतो मग आम्हाला दुःख का सहन करावे लागत आहे आणि जे कधी भगवंताचे नाम घेत नाही ते अतिशय सुखात आहे.
आपले जीवन हा अनंत जन्माचा प्रवास आहे आणि आलेली सुख दुःख हे एकाच जन्मातली अजिबात नाही 
पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी ।। या ओवी प्रमाणे
 अनेक जन्म व त्यातील पाप पुण्याचा हिशोब आपल्या लक्षात येणार नाही पण भगवंत हा आपल्याच हृदयात अनंत जन्मापासून आहे त्याने मात्र हा हिशोब चोख ठेवला आहे त्यामुळे ईश्र्वरावर अविश्वास न दाखवता आपले नामस्मरण सुरू ठेवावे कारण हे पुण्य जोडल्या जाते आहे हे लक्षात ठेवावे आणि जर आपण मनोभावे स्मरण करत असाल तर हे सर्व सहन करण्याची शक्ती आपल्याला मिळाली आहे हे सुध्दा विचारांती लक्षात येईल आणि जे कोणी ईश्र्वर स्मरण करत नसतील त्यांचा हिशोब पण तयार आहे त्यामुळे तिकडे लक्ष न देता आपले भोग भोगावे. *भोग तो नघडे संचिता वाचोनी ।।* हे प्रमाण लक्षात ठेवून
आपण नित्य भगवंताचे नामस्मरण करत असू आणि तेही कोणतीही सांसारिक इच्छा न ठेवता तर आपल्या हृदयात असलेला भगवंत निश्चित आनंदी होईल आणि त्याला तेथेच वास्तव्य करायला आवडेल आणि भगवंत जर आपल्या हृदयात आनंदी राहिला तर तो आपले सदैव रक्षण करेन.
माघे पुढे उभा राहे सांभाळीत ।।
आलिया आघात निवाराया ।।
 
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज माळी नंदूरबार 
खान्देश विभागीयअध्यक्ष :- अखिल भारतीय वारकरी मंडळ