धकाधकीच्या जीवनात मनःशांती हवी आहे?; मग ‘हे’ करा

आजकालची तरुण पिढी या धकाधकीला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गोंधळाला सरावली आहे म्हणून तो सारा ताण सोबत घेऊनच जगले पाहिजे, जगायचे असते असे या पिढीने ठरवले आहे.

  मनाला दिलासा मिळावा आणि दैनंदिन जीवनाच्या धकाधकीतून बाहेर पडून थोडी मन:शांती प्राप्त व्हावी यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. वैद्यकीय शास्त्रात पाश्‍चात्त्यांनी बरीच प्रगती केली असली आणि आपण या बाबत मागे आहोत असे मानले जात असले तरी मन:शांतीसाठी काय करावे याबाबत भारतीय विचार पाश्‍चात्त्यांच्या पुढे आहे.

  मनाच्या आरोग्यावर भारतीयांनी अधिक विचार केलेला आहे. आपल्या काही आरोग्याच्या समस्या सतवायला लागल्या की घराबाहेर पडायचे आणि डॉक्टरचा सल्ला घ्यायचा ही आपली सवय आहे पण प्रत्यक्षात मनाला काही त्रास झाल्यावर डॉक्टरकडे जाण्याची गरज आहेच असे नाही.

  काही काळ एकांतात घालवा
  आपण आपल्या घरात आणि आपल्या सवडीनुसार काही सोपे उपाय योजायला लागलो तर आपल्या निदान मानसिक समस्या तरी नक्कीच सुटतात. आपले अनेक विकार हे मानसिक कारणांनी निर्माण झालेले असतात तेव्हा मनाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले की या विकारांपासून सुटका व्हायला मदत होते. दररोजच्या धकाधकीतून वेळ काढून आठवड्यातला एक दिवस तरी शांत ठिकाणी जाऊन राहणे हा मन:शांतीवरचा सर्वात सोपा उपाय आहे. आपल्या व्यावहारिक जगण्यात अनेक ताणतणाव असतात आणि त्यातून अनेक वैचारिक प्रश्‍न निर्माण होतात. असे आपल्या मनाला अस्वस्थ करणारे प्रश्‍न शांत वातावरणात सुटायलाही मदत होते आणि त्यातून निर्माण झालेला ताणही हलका होतो.

  एखादे गाणे ऐका
  आजकालची तरुण पिढी या धकाधकीला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गोंधळाला सरावली आहे म्हणून तो सारा ताण सोबत घेऊनच जगले पाहिजे, जगायचे असते असे या पिढीने ठरवले आहे. पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यावर उपाय शोधणे फार अवघड आहे असेही या पिढीने मानलेले आहे. खरे तर दररोज काही काळ शांतपणे बसून गाण्यांचा आस्वाद घेणे यावर गुणकारी ठरते. हा अगदी सोपा उपाय आहे. फार वेळही द्यावा लागत नाही आणि कोठे बाहेरही जावे लागत नाही. पण एवढ्या सोप्या उपायाने दुर्मिळ समजली जाणारी मन:शांती प्राप्त होऊ शकते. विनोदी चुटकुल्यांचे पुस्तक घरात असावे आणि त्यातला एखादा विनोद जाता येता वाचला तरीही मनाला दिलासा मिळतो. एखाद्या लहान बाळाशी त्याच्या भाषेत गप्पा मारणे आणि त्याचे निखळ हास्य पाहणे किंवा संगणकावर एखादा गेम काही मिनिटांसाठी खेळणे हाही मन:शांतीवरचा उपाय आहे. आपलेच जुने फोटो पहात बसणे हाही एक सोपा उपाय आहे.