श्रीमंत व्हायचं आहे? मग आचार्य चाणक्यांची ही सूत्र नक्की वापरा

आर्य चाणक्य म्हणतात की, भविष्यातल्या आपत्तीवर मात करण्यासाठी संपत्ती जोडून ठेवणे श्रेयस्कर असते. (धनसंचयावर त्यांनी अधिक भर दिलेला आहे).

  अष्टपैलु व्यक्तिमत्त्व म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे  आर्य चाणक्य हे आहेत. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, गणित, व्यवस्थापन, लष्करी डावपेच, कायदा, प्रशासन ह्या आणि अशा अनेक शास्त्रात पारंगत असणारे कौटिल्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात त्याचे महामंत्री होते.

  चंद्रगुप्त मौर्याचं मगध देशाचा राजा होण्याचं, त्याचा राज्यविस्तार होण्याचं, तो सम्राट होण्याचं श्रेय जातं ते फक्त आणि फक्त आचार्य चाणक्य यांना. चंद्रगुप्त हा त्यांचा शिष्य. ज्याला चाणक्यांनी उत्तम, आदर्श राजा होण्याचे सर्व पाठ दिले.

  अतिशय चतुर, विद्वान असणाऱ्या कौटिल्यानी अर्थशास्त्रावर आधारित ग्रंथ लिहिला जो कौटिल्य अर्थशास्त्र म्हणून ओळखला जातो. या ग्रंथात राजाने कसे वागावे याबरोबरच मानवाला जीवनातल्या प्रत्येक पैलुबद्दल शिक्षित करणे, त्याबद्दल व्यावहारिक ज्ञान देणे हे लिहिलेले आहे.

  यात प्रामुख्याने धर्म, अर्थ, संस्कृती, न्याय, शांती तसेच मानवाची सर्वतोपरीने प्रगती व्हावी ह्यासाठी सूत्रे दिली आहेत. कारण कठिण काळात किंवा वेळप्रसंगी हाच साठवलेला पैसा उपयोगी पडतो (आत्ताच्या ह्या लॉकडाऊनमधे ह्याचा प्रत्यय येतो आहे)

  चला तर मग पाहूया धनासंबंधी आचार्य चाणक्य यांनी काय सांगितलं आहे ते!

  धन नेहमी चांगल्या मार्गानेच कमवावं, कोणत्याही वाईट मार्गाने धन कमवू नये. चांगल्या मार्गाने कमावलेलं धन टिकून राहतं. सुख, शांती देतं.

  चांगल्या मार्गाने कमावलेला पैशांचा व्यय देखील चांगल्या मार्गानेच करावा. अर्थात कमावलेलं धन खर्च करताना देखील योग्य तिथेच, नीट विचार करून खर्च करावे.

  धनाचा संचय योग्य मार्गानी केला असता निवेश देखील योग्य त्या पद्धनीनेच करावा आणि गरजवंतांना मदत करणे कधीही विसरू नये म्हणजेच अडल्या-नडल्यांना नेहेमीच मदत करावी.

  ज्या धनासाठी शत्रुची स्तुती करावी लागते, तसेच आपल्या धर्माचा (इथे धर्म म्हणजे नेमून दिलेले काम जसे क्षत्रिय धर्म दुसऱ्याचे, प्रजेचे संकटापासून रक्षण करणे, शिक्षकाचा धर्म विद्यार्थ्यांना योग्य ती शिक्षा देणे इत्यादी) त्याग करावा लागतो अशा धनाचा अजिबात मोह धरू नये.

  पुढे चाणक्य सांगतात, जिकडे मुबलक प्रमाणात रोजगार आणि उपजीविकेची साधने उपलब्ध आहेत तिथेच वास्तव्य करावे कारण, अशा ठिकाणी कधीच उपाशी पोटी किंवा रिकाम्या हाती राहावं लागत नाही. नाहीतर बेरोजगारी वाढीस लागते.

  व्यवस्थित माहिती मिळवून सफलतेच्या खात्रीनंतरच एखादे लक्ष्य ठरवावे आणि त्यानुसारच कार्य करावे. चाणक्य सांगतात पैसा हा कौटुंबिक जीवनाचा पाया आहे. आपल्या कुटुंबाला आवश्यक तेवढे धन कमावणे अपरिहार्य आहे. एखादा मनुष्य धनार्जनाकरिता काहीच प्रयत्न करत नसेल तर त्याची कुटुंबीय,आप्त स्वकीय त्याला सोडून जातात.

  पण सगळ्यांच्या पोषणाइतके धन त्याने कमावले तर त्याचे कुटुंब त्याच्यासोबतच आनंदाने राहते. पुढे ते सांगतात जेवढी आवश्यकता आहे तेवढीच संपत्ती कमावणे किंवा जेव्हढी गरज आहे तेवढीच संपत्ती खर्च करणे योग्य आहे.

  ऐशोआराम, चैनीवर उधळपट्टी करण्यापेक्षा जास्तीची संपत्ती संचय करून ठेवावी. कठिण काळ सांगून येत नाही त्यावेळी ह्या संपत्तीचा योग्य तो उपयोग करता येतो. त्यामुळे उधळपट्टी करण्यापेक्षा धन साठवून ठेवणे फायदेशीर ठरते.

  धन, ज्ञान आणि अन्न हे जीवनातील महत्त्वाचे घटक आहेत. ह्यांचा कधीच त्याग करू नये. त्यांचा स्वीकार करण्यासाठी, हे संपादन करण्यासाठी सतत तयार रहावे, सतत प्रयत्न करावेत.

  आर्य चाणक्य म्हणतात की, भविष्यातल्या आपत्तीवर मात करण्यासाठी संपत्ती जोडून ठेवणे श्रेयस्कर असते. (धनसंचयावर त्यांनी अधिक भर दिलेला आहे).

  भविष्यातल्या काही घडामोडींसाठी देखील पैशांची आवश्यक्ता असते. आपल्या पुढील पिढीकरिता पैशांची सोय करून ठेवणे गरजेचे असते.

  त्यामुळे पैशांचा अपव्यय टाळावा. विनाकारण पैसा खर्च करू नये भविष्यात तोच साठवलेला पैसा पुढच्या पिढीसाठी तसेच आपत्ती, संकटात उपयोगी पडतो.