वारी पंढरीची

महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या भूमीत अनेक संतांनी अवतार धारण करून सर्वांना एकतेचा, सन्मार्गाचा, सद्विचारांचा, सदाचाराचा उपदेश आपल्या कृतीतून देऊन समाजा हितासाठी संत वाड्मयाची निर्मिती करून उद्देश केला. म्हणून संत त्यांनाच म्हणतात. सन्मार्ग वर्तीन: संत :|

 होय होय वारकरी

पाहे पाहे रे पंढरी
 
महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या भूमीत अनेक संतांनी  अवतार धारण करून सर्वांना एकतेचा, सन्मार्गाचा, सद्विचारांचा, सदाचाराचा उपदेश आपल्या कृतीतून देऊन  समाजा हितासाठी संत  वाड्मयाची निर्मिती करून उद्देश केला. म्हणून संत त्यांनाच म्हणतात. सन्मार्ग  वर्तीन: संत 😐  जे संमर्गाने  वागतात व इतरांनाही वागायला लावतात ते संत असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत चोखोबा राय, श्री संत सावता महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत नरहरी सोनार, श्री संत कबीर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सेना न्हावी महाराज, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई इत्यादी संत सर्व जाती धर्माचा भेदभाव संपवण्यासाठी सर्व जाती-धर्मात अवतार घेऊन ‘सर्वाधिकारसेव्य’ वारकरी संप्रदायाचा पुरस्कार केला. संप्रदाय त्यालाच म्हणतात, आमचे श्रीगुरु भाऊ महाराज पाटील सांगत असत स सम्यक  प्रकर्शेन दियते अनेन इति संप्रदाय:| म्हणजे ज्याच्यामध्ये ‘यथार्थ’ विशेष रूपाने जगाला दिले जाते त्याला संप्रदाय म्हणतात आणि असा फक्त वारकरी संप्रदाय आहे.
त्या वारकरी संप्रदायामध्ये उत्तम नीती आहे, उत्तम निष्ठा आहे आणि उत्तम नियम आहे. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे | ही नीती आहे देह जावो अथवा राहो|  पांडुरंगी दृढ भावो || ही निष्ठा आहे आणि पंढरीचा वारकरी होऊन ही वारी करणे हा नियम आहे. म्हणून श्री संत तुकाराम महाराज सांगतात ‘होय होय वारकरी’ आम्ही वारकरी झाले पाहिजे. यामध्ये वारकरी शब्दातील व अतिशय महत्त्वाचा आहे. ‘व’ म्हणजे वृत्त ‘ वृत्त एकादशी करेन उपवासी’ | ‘ व’ म्हणजे ‘ वारी’ व म्हणजे वासना क्षय असा वारकरी झाला पाहिजे. 
खरा वारकरी कसा असतो ‘ जो घरातून पंढरपूरला निघाल्यानंतर शरीराने पंढरपूरला पोहचायला आणखी वेळ आहे पण मनाने केव्हाच पंढरपूरला पोहचलेला असतो.  आणि तिथे पोहचल्यावर पंढरी क्षेत्रातील सर्व नियम चारंद्रभागास्नान, नगर प्रदक्षिणा, श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन, हरिकीर्तन  श्रवण, नामस्मरण, गोपाळकाला करून जेव्हा तो आपल्या गावाकडे निघतो तेव्हा तो मन  श्री पांडुरंगाचे चरणी ठेऊन फक्त देहानेच गावाकडे फिरतो तो खरा वारकरी आहे . परंतु, थोडी खेदाची गोष्ट म्हणजे या वर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे अनेक पिढ्या पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना यावर्षी शरीराने आपली वारी समाजहितासाठी पूर्ण करता आली नाही. पण प्रत्येक वारकरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाल्या दिवसापासून घरी बसून  आपली मानसिक वारी करीत आहे. तो वारीचा आनंद शब्दात प्रकट होतच नाही. ती वारी केल्यावरच तो आनंदाचा अनुभव घेता येतो. माऊलींच्या सोहळ्यातील भजनानंद हा ब्रह्मानंद आहे. " सोपे वर्म आम्हा सांगितले संती| टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा| समाधीचे सुख सांडा ओवळूनी| ऐसा या कीर्तन ब्रह्मरस || म्हणून आम्ही वारकरी झाल पाहिजे. आणि वारकरी होऊन महाराज म्हणतात. ‘ पाहे पाहे रे पंढरी| ‘ पंढरपूर पाहा कारण पंढरपूराच वर्णन करताना आद्य गुरु शंकराचार्य याला महायोगपिठ म्हणतात.  नाही उपमा द्यायवाचा | समतुल्य अणिका ठाया | धन्य भाग्य जया | जे पंढरपूर देखती || जेथे सर्व वारकरी संतांच्या पालख्या एकत्र येतात ते पंढरी क्षेत्र आहे. पंढरीत जे आहे ते इतर क्षेत्रात नाही. काही क्षेत्रे आहेत जेथे देव आहे पण भक्त नाही. काही ठिकाणी भक्त आहेत पण देव नाही. काही ठिकाणी भक्त देव आहेत पण तिथे तीर्थ नाही. पंढरी क्षेत्रात सर्वकाही आहे. 
सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव | 
शास्त्रांनी हा भाव निवडीला ||
 म्हणून सर्वांनी वारकरी होऊन आत्मरूपाने पंढरी पाहा म्हणजे जीवन कृतार्थ होईल. 
 
 
शब्दांकन : ह. भ. प. वेदांताचार्य दत्तात्रय महाराज हुके. (गाव: परंडा)