पायात काळा धागा बांधणे योग्य की अयोग्य; जाणून घ्या शास्त्र काय सांगते

  अनेकांच्या पायामध्ये काळा धागा बांधलेला आपण पाहिले असेल. असे करण्यामागे धार्मिक मान्यता आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, पण पायात काळा दोरा बांधणे योग्य की अयोग्य याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. जाणून घेऊया शास्त्र याबद्दल काय सांगते?

  धर्मशास्त्रांच्या अनुसार मंगळवारच्या दिवशी शुभ मुहूर्तावर काळा धागा उजव्या पायामध्ये बांधला गेल्यास त्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मीचे आगमन होते. तसेच त्या व्यक्तीवर लक्ष्मी नेहमी प्रसन्न रहात असून, आर्थिक तंगी दूर होण्यास मदत होत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील त्यांना मंगळवारी उजव्या पायामध्ये काळा धागा परिधान करण्याचा सल्ला देण्यात येत असतो.

  अनेक व्यक्तींना वारंवार पोटदुखीचा त्रास होत असतो. ही पोटदुखी कोणत्याही निश्चित कारणाविना उद्भवत असते. कधी हे दुखणे सहन होऊ शकणार नाही इतपत वाढते. अशा वेळी पायाच्या अंगठ्याभोवती काळा, किंवा इतर कोणत्याही रंगाचा धागा घट्टसर गुंडाळल्याने पोटदुखी कमी होण्यास मदत होते. हा अॅक्यूप्रेशर या उपचारपद्धतीमध्ये मोडणारा उपाय पुष्कळ प्रभावी समजला जातो. महिलांच्या बाबतीत मासिक पाळीमध्ये उद्भवणाऱ्या पोटदुखीसाठीही हा उपाय उत्तम समजला जातो.

  ज्यांना पायाला काही इजा झालेली असून, ही इजा उपचार करूनही लवकर बरी होत नसल्यासही काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. वाईट दृष्ट लागू नये यासाठीही, विशेषतः लहान मुलांच्या पायामध्ये काळा धागा बांधण्याची पद्धत आपल्याकडे प्राचीन काळापासून रूढ आहे. काळा रंग शनीचा आवडता असून, शनीची कृपा रहावी यासाठीही अनेक जण उजव्या पायामध्ये काळा धागा परिधान करत असतात. काळा धागा पायामध्ये परिधान केल्याने व्यक्तीच्या आसपासची नकारात्मक शक्ती नाहीशी होत असल्याची मान्यता रूढ आहे.

  काळा धागा परिधान करायचा झाल्यास हा धागा मंगळवारी किंवा शनिवारी परिधान केला जावा. तसेच जो धागा परिधान करायचा आहे, तो परिधान करण्याआधी मारुतीच्या मंदिरामध्ये नेला जावा. त्यामुळे हा धागा अधिक परिणामकारक होत असल्याचे म्हटले जाते.

  (वरील माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारे देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये)