yavatmal artist

महाराष्ट्रातील (Maharashtra Tableau) कोल्हापूर, तुळजापूर, माहुर व वणी येथील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन चित्ररथाद्वारे पथसंचलनात होणार आहे.ही सर्व शिल्प केळापूर तालुक्यात असलेल्या पाटणबोरी येथील यशवंत एनगुटीवार या शिल्पकाराने साकारली आहे.

    यवतमाळ: राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2023) पथसंचलनात महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठ आणि नारी शक्ती या थीमवर चलचित्र देखावा साकारला जाणार आहे. विशेष म्हणजे या चलचित्र देखाव्यावरील (Maharashtra Tableau) संपूर्ण शिल्प ही यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पाटणबोरी येथील यशवंत येनगूटीवार यांनी तयार केली आहेत. त्यामुळे पाटणबोरीचे (Patanbori) नाव राजधानी दिल्लातही कोरले जाणार आहे.

    महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहुर व वणी येथील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन चित्ररथाद्वारे पथसंचलनात होणार आहे.ही सर्व शिल्प केळापूर तालुक्यात असलेल्या पाटणबोरी येथील यशवंत एनगुटीवार (Yashwant Engutiwar) या शिल्पकाराने साकारली आहे. यशवंत यांना पिढीजात मूर्ती कलेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्र नव्हे तर देशाबाहेर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया, दुबई तसेच श्रीलंका येथे त्यांनी विविध शिल्प साकारून पाठविले आहे. पिढीजात मूर्ती कलेला तांत्रिक व तर्कशुद्ध शिक्षणाची जोड मिळावी म्हणून मुंबई येथील जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. बहुतांश शिल्पांची उंची सहा फूट ते नऊ फुटांपर्यंत राहणार आहे. विशिष्ट फायबरपासून ही शिल्प तयार करण्यात आली आहे. अल्प कालावधीत म्हणजे केवळ दहा दिवसांच्या अंतरात ही सर्व शिल्प साकारण्यात आली आहेत.

    चित्ररथाची मर्यादा, रंगीत तालीम आणि तयारी
    चित्ररथांची लांबी ४५ फूट, उंची १६फूट आणि रुंदी १४ फूट अशी मर्यादित केलेली असते. चित्ररथ बांधणीसाठी मिलिटरी कॅन्टोन्मेंटमधील जंगलात संरक्षण मंत्रालयातर्फे कडक सुरक्षा व्यवस्थेसह मोठा कॅम्प उभारला जातो. कॅम्पमध्ये चित्ररथ बांधणीचे काम करण्यासाठी एक स्वतंत्र सपाट जागा उपलब्ध करून दिली जाते. बांधणीचे काम करणाऱ्या व्यक्तींकरिता, चित्ररथाशी निगडित सादरीकरण करणाऱ्या महिला आणि पुरुष कलाकारांकरिता स्वतंत्रपणे सुविधा दिल्या जातात. डॉक्टरांसह सर्व प्रकारची वैद्यकीय सुविधा त्यांना दिली जाते. दरवर्षी २३ जानेवारीला संचलनाची रंगीत तालीम होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रमुख पाहुणे इत्यादींच्या पेहरावातील कलाकार त्यात परफॉर्म करतात. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मूळ विषयाला अनुरूप संगीत, नाट्य आणि नृत्याचे सादरीकरण केले जाते. प्रत्येक चित्ररथाला ५८ ते ६२ सेकंद अशी वेळ दिलेली असते.