मोठी बातमी ! मिरज दंगल प्रकरणात 106 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

    सांगली : मिरज शहरामध्ये 2009 दरम्यान झालेल्या जातीय दंगली प्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान ही जातीय दंगल घडली होती.

    मिरज दंगलीचे (Miraj Riot) पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत उमटले होते. आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने हा खटला निकाली काढत 106 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

    काय घडलं होतं ?

    मिरज शहरात 2009 साली गणेशोत्सवाकाळात शिवसेनेकडून मिरज शहरामध्ये अफजलखान वधाच्या फलक उभारण्यात आला होता. त्यावर लिहिण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मिरज शहरामध्ये जातीय दंगल भडकली होती. दहा ते पंधरा दिवस मिरज शहर या दंगलीत धगधगत होते. या दंगलीचे पडसाद सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले होते.

    मिरज-सांगली शहरांमध्ये पंधरा दिवस कडक संचारबंदी लागू होती. या दंगली प्रकरणी सांगली महापालिकेचे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या 106 जणांहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.