प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    सांगली : विट्यातील एकाने जर्मनीत डॉक्टर असल्याचे सोशल मीडियावर भासवून एका वकील महिलेला तब्बल १५ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी वैभव सुरेश शिंदे (वय २९, लेंगरे ता. खानापूर) यास विटा पोलिसांनी अटक केली आहे.

    याबाबतची सविस्तर हकीकत अशी की, मागच्या वर्षी २०२० मध्ये मे महिन्यात कोरोना महामारीमुळे भारतासह संपूर्ण जगभरात लॉकडाऊन होते. त्यामुळे बहुतांश लोक हे सोशल मीडियावर अथवा इंटरनेटद्वारे जगाशी संपर्कात होते. याच काळात लेंगरे येथील वैभव शिंदे यानेही फेसबुक आणि इंस्टाग्राम या समाज माध्यमांवर भरत जाधव या नावाने फेक अकाउंट काढले. तसेच कुठल्या तरी मॉडेल तरुणाचा फोटो लावून मुंबईतील एका महिला वकीलाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. विशेष म्हणजे या दोन्ही समाज माध्यमांवर वैभव शिंदे याने त्याच्या प्रोफाईलमध्ये तो जर्मनी देशामध्ये डॉक्टर व्यवसाय करीत असल्याचे खोटेच लिहिलेले होते. त्यामुळे या वकील महिलेने त्याच्याशी पटकन मैत्री केली. त्यानंतर त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले.

    कधी हिंदी, कधी मराठीत संभाषण करून वैभव शिंदे याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी आपला मोबाईल नंबर हे या महिला वकिलाला दिला. त्यानंतर व्हॉट्सऍपच्या माध्यमातूनही या दोघांचे चॅटिंग सुरू झाले. त्यानंतर व्हॉटसअॅप द्वारे मेसेजेस, फोन कॉल करुन आणखी विश्वास संपादन केला. तसेच अनेकवेळा तिच्याशी त्याने भावनिक गप्पा मारल्याने सलगी वाढत गेली. मात्र, यादरम्यान वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिला वकिलाकडून वैभव शिंदे याने वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून तब्बल १४ लाख ९२ हजार रुपये घेतले.

    आई-वडील आजारी, चुलत्याचे निधन 

    ही रक्कम महिला वकिलांकडून घेताना त्याने आपली आई कोरोनाने आजारी आहे. आपले वडील आजारी आहेत. चुलते वारलेत, बहिणीचा नवरा सिरियस आजारी आहे. आपण भारतात येण्यासाठी निघतोय परंतु आपले कोणीतरी पाकीट मारले आहे. त्यात क्रेडिट कार्डस, डेबिट कार्डस होती. तिकडे आल्यानंतर बँक ट्रान्सफर करतो वगैरे अशा बतावण्या त्याने केल्या. परिणामी, या सर्व गोष्टी आपल्याला खऱ्या वाटल्याने आपण पैसे दिले, असे संबंधित महिला वकीलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

    सोशल मीडिया अकाउंट केले बंद

    अखेरीस ७ जूनला वैभव शिंदे याने अचानक समाज माध्यमाची आपली भारत जाधव नावाने काढलेली सगळी अकाऊंटस बंद केली. त्यामुळे या महिलेवर जणू आभाळच कोसळले. त्यानंतर त्यांनी थेट महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला. तसेच या संबंधित भरत जाधव म्हणजेच वैभव शिंदे याचा मोबाईल नंबर जो त्याने व्हॉट्सऍपसाठी वापरला होता तो नंबर दिला. त्यावरून संबंधित नंबर सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावातील वैभव शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

    विटा पोलिसांत फिर्याद

    या वकील महिलेने विटा पोलिस ठाण्याकडे धाव घेतली आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. शिवाय दोघातील संभाषणाचे आणि वैभव शिंदे यांना वेळोवेळी पैसे दिल्याचे पुरावे दिले. त्यावरून वैभव शिंदे याच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम कायदा ४२०, ४६५,४१७, ४१९, तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६, ६६ ड प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे.