आशा, गटप्रवर्तक संपावर; महापालिकेवर मोर्चा

    सांगली : महासभेत मानधनवाढीचा ठराव होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढला. सेवेत कायम करण्यासह शासनस्तरावरील अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका क्षेत्रातील २०० आशासेविका बेमुदत संपात उतरल्या आहेत.

    लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महापालिकेवर मोर्चा निघाला. आमराईपासून मोर्चास सुरुवात झाली. युनियनचे जिल्हा सेक्रेटरी उमेश देशमुख, मीना कोळी, सुरेखा जाधव,अंजू नदाफ, दीपाली होरे, शबाना आगा, लता जाधव, अनुपमा गौंड, हणमंत कोळी व महापालिका क्षेत्रातील आशा, गटप्रवर्तक यांनी मोर्चात सहभाग घेतला. आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनवाढीचा ठराव महापालिकेने केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नसल्याने महापालिकेवर मोर्चा काढला. कोरोना कालावधीतील भत्ता तातडीने द्या. इतर मानधनवाढ झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

    ठरावानुसार कार्यवाही होणार : महापौर

    महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, महासभेत झालेल्या ठरावानुसार कोरोना कालावधीतील मानधनवाढीची अंमलबजावणी तातडीने होईल. तांत्रिक कारणांमुळे थोडा विलंब झाला होता. शासनस्तरावरील अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाईल.