मराठा समाज संस्थेच्या अध्यक्षपदी अभिजीत पाटील तर उपाध्यक्षपदी ए. डी. पाटील

  सांगली : अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या मराठा समाज, सांगली संस्थेच्या अध्यक्षपदी अभिजीत दत्तात्रय पाटील यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या 74 व्या वार्षिक सभेत हा निर्णय झाला. उपाध्यक्षपदी आनंदराव धोंडीराम पाटील (ए.डी.), सरचिटणीसपदी इंजिनियर प्रमोद शामराव शिंदे तर खजिनदारपदी विकास सदाशिव मोहिते यांचीही निवड एकमताने करण्यात आली आहे. कार्यकारणीत काही अनुभवी व काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

  संस्थेचे अध्यक्ष पाटील व्यवसायाने शेतकरी आहेत. राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. ते तत्कालीन सांगली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सांगली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डी. के. काका पाटील यांचे चिरंजीव आहेत. गेली 24 वर्षे ते मराठा समाज संस्थेमार्फत सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून ते नव्या संकल्पना राबवतील, असा विश्वास आहे.

  नवे उपाध्यक्ष ए. डी. पाटील सहकार, सामाजिक, पुरोगामी चळवळीशी निगडित आहेत. सहकार व आर्थिक क्षेत्रातील कामाचा त्यांना बेचाळीसहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. मराठा सोशल ग्रुपचे ते कुटुंब प्रमुख व सांगली जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक आहेत. सरचिटणीस श्री. शिंदे बांधकाम व्यवसायिक आहेत. इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. खजिनदार मोहिते सहकार, राजकीय, व्यापार क्षेत्रात सक्रिय आहेत.

  अशी आहे नवी कार्यकारिणी :

  अध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष ए. डी. पाटील, सरचिटणीस प्रमोद शिंदे, खजिनदार विकास मोहिते, सदस्य-आर. एस. पाटील, डी. के. काका पाटील, रघुनाथ पाटील, अशोक सावंत, प्रकाश चव्हाण, ऍड. उत्तमराव निकम, डॉ. मोहन पाटील, बाबासाहेब भोसले, अशोक घोरपडे, संभाजीराव पाटील-सावर्डेकर, जयवंत सावंत, शशिकांत जाधव, गौतम पाटील, ऍड. विलासराव हिरुगडे-पवार, विक्रमसिंह पाटील-सावर्डेकर, अमर मोहिते, दत्तात्रय सावंत, डॉ. नितिन पाटील, साखर कारखाना प्रतिनिधी पी. आर. पाटील (राजारामबापू, साखराळे), विशाल प्रकाशबापू पाटील (वसंतदादा, सांगली) मराठा समाज संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात नव्या पिढीसाठी गरजेचे उपक्रम राबविण्याचा मानस अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला आहे.

  त्यात मराठा समाज संस्था अमृतमहोत्सवी स्मृती उद्यान विकसित करणे, बेरोजगार तरुणांसाठी स्थानिक कंपन्या, बँका, सहकारी संस्था, उद्योग यांच्याशी समन्वय साधून रोजगार मेळावा घेणे, वैवाहिक जीवनातील अडचणी व आव्हाने याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी नवविवाहितांसाठी समुपदेशन घेणे आदी अनेकविध उपक्रमांचा समावेश आहे.